अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- इन्स्टंट लोन अॅपप्रकरणी होत असलेल्या छळाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना हैदराबादमध्ये घडली असून ३६ वर्षीय तरूणाने आपलं जीवन संपवलं आहे.
तसेच आतापर्यंत या प्रकरणी चार जणांनी आत्महत्या केली असून ही पाचवी आत्महत्या आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जी. चंद्रमोहन या तरुणानं याप्रकरणी आत्महत्या केली. चंद्रमोहन एका सुपरमार्केटमध्ये सुपरवाझर म्हणून काम करत होता. गुंडमपोचमपल्ली येथील त्याच्या घरातच तो मृतावस्थेत आढळून आला.
याप्रकरणी पेटबाशिराबाद पोलीस ठाण्यात याप्रकरणी कलम ३०६, ४२०, ३४८ आणि ६७ आयटी कायद्यांतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. लॉकडाउनच्या काळात आर्थिक चणचण भासत असल्याने चंद्रमोहनने विविध इन्स्टंट लोन देणाऱ्या अॅप्सवरुन ८०,००० ते १ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज घेतलं होतं. त्याने कर्जाची मुद्दलही चुकती केली होती,
मात्र विविध चार्जेसच्या नावाखाली अधिक रक्कम भरण्यास त्याला जबरदस्ती करण्यात येत होती. या त्रासाला कंटाळून त्याने शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पत्नी आणि तीन मुलं घरात नसताना स्वतःच्या खोलीत जाऊन फाशी घेतली. त्याचे कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
दरम्यान, डिसेंबरमध्ये ईडू श्रवन यादव, किर्नी मौनिका, पी. सुनील आणि संतोष कुमार या चार जणांनी या इन्स्टंट लोन अॅप कंपन्यांकडून होत असलेल्या छळवणुकीला कंटाळून आपलं जीवन संपवलं. आता चंद्रमोहनने देखील टोकाचे पाऊल उचलले आहे.