कॉपी कराल तर फसाल ; सावधान ! विद्यार्थ्यांवर आता थेट फौजदारी गुन्हा

Published on -

७ फेब्रुवारी २०२५ मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपी कराल तर फसाल, थेट फौजदारी गुन्हाच दाखल केला जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सामोऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे.बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होत असल्यामुळे कॉपी करताना पकडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर हा निर्णय गंभीर परिणाम करणारा ठरू शकतो.

विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर समुपदेशक नेमण्यात आले आहेत.त्यांची मदत विद्यार्थ्यांना घेता येईल. पण कॉपी करणे मात्र परीक्षार्थी विद्यार्थ्यांना महागात पडेल, असे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षा काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत.त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

जर विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेला,तर त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, ही तरतूद या नियमांतच करण्यात आली आहे,असे गोसावी यांनी म्हटले आहे.या निर्णयाची माहिती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आली आहे,असे ते म्हणाले.

कॉपी न करण्याचे आवाहन

विद्यार्थी आणि त्यांना कॉपी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांवरही फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये, शांतपणे पेपर लिहावेत. कॉपी करू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे. विद्यार्थ्यांना काही अडचण असेल, परीक्षेचा तणाव असेल तर ते समुपदेशकाची मदत घेऊ शकतात. त्यांना ते फोनवर संपर्क करू शकतात, असेही गोसावी यांनी स्पष्ट केले.

हॉल तिकीट विसरले तरी परीक्षेची मुभा

हॉल तिकीट विसरलेल्या विद्यार्थ्याला परिक्षेला त्या दिवशी बसू दिले जाईल. मात्र त्याच्याकडून हमी पत्र लिहून घेतले जाईल आणि दुसऱ्या दिवशी मात्र त्याला हॉल तिकीट आणावे लागेल. परीक्षेला कोणत्याही वेशभूषेत येता येईल, असेही परीक्षा मंडळाने स्पष्ट केले आहे. मात्र विद्यार्थ्यांची तपासणी केल्यावरच त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!