महाराष्ट्राला ज्याप्रमाणे निसर्गाचा समृद्ध असा ठेवा लाभलेला आहे. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राला ऐतिहासिक समृद्धीचा ठेवा देखील लाभला असल्याने महाराष्ट्रमध्ये इतिहासाच्या पाऊलखुणा असलेले अनेक गड किल्ले आपल्याला दिसून येतात. या गडकिल्ल्यांची वैशिष्ट्य म्हणजे हे निसर्गाच्या समृद्धतेने नटलेले तर आहेतच
परंतु आपल्याला आपल्या इतिहासाच्या खानाखुणा आणि तेव्हाची जीवनशैली इत्यादी बद्दल अनमोल माहिती देण्याचे काम देखील या माध्यमातून होते. त्यामुळे अशा गडकिल्ल्यांना भेट देणे ही एक पर्यटकांसाठी पर्वणीच असते व त्यामुळे उन्हाळा असो की पावसाळा या कालावधीमध्ये ट्रेकिंग तसेच इतर सहासी पर्यटनाची आवड असलेले पर्यटक मोठ्या प्रमाणावर अशा गडकिल्ल्यांना भेटी देतात.
महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांग ही ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक असून या पर्वतरांगेत अनेक गड किल्ले आहेत. अशाच प्रकारचा एक किल्ला मराठी इतिहासाचा एक समृद्ध ठेवा असून तो सह्याद्रीच्या पर्वत रांगेत स्थित आहे व या किल्ल्याचे नाव आहे राजमाची किल्ला हे होय. याच किल्ल्याविषयीची माहिती आपण या लेखात बघू.
राजमाची किल्ला आहे एक ऐतिहासिक किल्ला
सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये असलेल्या अनेक किल्ल्यांपैकी राजमाची किल्ला हा एक ऐतिहासिक किल्ला असून साधारणपणे समुद्रसपाटीपासून 3000 फूट उंच आहे. तुम्ही जर राजमाची किल्ल्यावर गेला तर तुम्हाला मनरंजन आणि श्रीवर्धन असे दोन गड किल्ले पाहायला मिळतात. बोरघाटाच्या उजव्या हाताला मुंबई पुणे महामार्गावरून जेव्हा आपण प्रवास करत असतो.
तेव्हा हा किल्ला आपल्याला दिसतो. ट्रेकिंगची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक प्रसिद्ध ठिकाण आहेच आणि तुम्ही जर लोणावळ्याला फिरायला गेला तर त्या ठिकाणहुन राजमाची किल्ला फक्त 16 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच या किल्ल्यावर जाऊन तुम्हाला जर मुक्काम करायचा असेल तर तुम्ही खाली असलेल्या उधेवाडी या गावात मुक्काम करू शकतात.
पावसाळ्याच्या कालावधीत तर या ठिकाणाचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. या ठिकाणी असलेल्या श्रीवर्धन किल्ल्यावरून तुम्ही अनेक धबधबे पाहू शकतात व यातील कातळधर धबधबा हा एक सुंदर निसर्गाचा नमुना आहे. तुम्हाला जर ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही कोंडाणे लेण्यांकडे ट्रेकिंग करू शकतात आणि त्या ठिकाणी सुंदर लेणी आणि धबधब्याचा आनंद देखील घेऊ शकतात.
राजमाची किल्ल्याचा इतिहास काय आहे?
सातवाहनांनी हा किल्ला बांधलेला असून त्याचा इतिहास देखील मनोरंजक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये हा किल्ला आणि आजूबाजूचे किल्ले विजापूरच्या आदिलशाहीकडून ताब्यात घेतले होते.
परंतु मुघल सम्राट औरंगजेबने 1704 मध्ये हा मराठ्यांकडून परत घेतला होता व त्याच्या पुढच्याच वर्षी मराठ्यांनी पुन्हा या किल्ल्यावर ताबा मिळवला आणि पुढे 1713 मध्ये शाहू महाराजांनी राजमाची किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दिला. त्यानंतर मात्र 1818 मध्ये जेव्हा मराठ्यांचा पाडाव झाला तेव्हा इंग्रजांनी मराठ्यांची काही प्रदेश आणि राजमाची किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला होता.
राजमाची किल्ल्यावर जाल तर हे ठिकाणी पहा
तुम्ही जर राजमाची किल्ल्यावर गेला तर त्या ठिकाणी तुम्ही उदयसागर तलाव पाहू शकतात. तलावाचे बांधकाम साधारणपणे 1712 मध्ये केले गेले असे म्हटले जाते. याच तलावाच्या बाजूला महादेवाचे मंदिर आहे.
तसेच श्रीवर्धन आणि मनरंजन गडाच्या जवळ जे पठार आहे त्यावर भैरोबाचे मंदिर देखील पाहायला मिळते. या ठिकाणचा कातळघर धबधबा निसर्गाचा समृद्ध ठेवा असल्याने मनाला खूपच विलोभनीय असा दिसतो.
राजमाची किल्ला हा त्याच्या सुंदर लँडस्केप्स आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असून कुठलाही कालावधीत तुम्ही या ठिकाणी जाल तर त्या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य तुमच्या मनाला मोहून टाकल्याशिवाय राहणार नाही. राजमाची हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय ट्रेकिंग डेस्टिनेशन म्हणून देखील ओळखले जाते.
कसे जाता येईल या किल्ल्यावर?
तुम्हाला जर रेल्वेने जायचे असेल तर सगळ्यात अगोदर लोणावळा रेल्वे स्टेशनवर तुम्हाला उतरावे लागेल आणि तेथून या किल्ल्यावर जाण्यासाठी खाजगी कॅब उपलब्ध आहेत. जर तुम्हाला मुंबईवरून यायचे असेल तर तुम्ही विमानाने पुण्याला येऊन नंतर टॅक्सीने या किल्ल्याला भेट देऊ शकतात. मुंबई पुणे महामार्गाने देखील राजमाची किल्ल्याला तुम्ही जाऊ शकतात.