अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत जे काही घडले आणि त्यावरून भाजपबाबत होत असलेली चर्चा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विमनस्क करणारी आहे.
सर्वाधिक सभासद, सर्वाधिक विश्वासार्हता आणि त्यामुळेच सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या भाजपसाठी ही चर्चा निश्चितच राजकीय दृष्ट्या धोकादायक आहे.
ऐनवेळी पक्ष बदलून सभापती झालेले मनोज कोतकर यांनी ते कोणत्या पक्षात आहेत, हे जाहीर करावे अन्यथा पक्षविरोधी कारवाईसाठी सामोरे जावे,
असे स्पष्ट मत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही निवेदन दिले आहे.
राज्यातील महाविकास आघाडीचा कारभार पाहता ते दिशाहीन झालेले दिसत आहेत. अशा दिशाहीन पक्षांच्या नादी लागून विश्वासार्हता जपलेल्या आणि सतत वाढीस लागणाऱ्या भाजपला गरजही नाही.
स्थायी समिती सभापती निवडणूक पक्षासाठी महत्वाची असली तरी पक्षाची प्रतिमा पणाला लावण्याएवढी निश्चितच मोठी नाही. सत्तेपेक्षा प्रतिमा जपण्यास भाजपने नेहमीच प्राधान्य दिले आहे.
या निवडणुकीमुळे पक्षाच्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित करणा-यांची तोंडे बंद करावे लागतील. त्यामुळे कोतकर यांनी वेळीच वस्तुस्थिती समोर मांडून स्वतः वरील कारवाई टाळावी.
त्यांना महाविकास आघाडीशी सोयरीक करायची असेल तर खुशाल करावी. मात्र पक्षाने त्यांच्यावर पक्षशिस्त भंग अन पक्षांतर यावरून कारवाई सुरू करावी, अशी मागणी ॲड. अभय आगरकर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved