पाथर्डी तालुक्यातील घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीने उपायोजना कराव्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील विविध भागात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असताना मनुष्य वस्तीत येणार्‍या बिबट्यांना प्रतिबंध करण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्या व बिबट्यांना रेडिओ कॉलर बसविण्याची मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन वन विभाग कार्यालय अधीक्षक डी.एन. शिरसाठ यांना देण्यात आले. यावेळी यशस्विनीच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील, मनीषा गायकवाड, रोहिनी वाघिरे, वैशाली नराल आदी महिला उपस्थित होत्या. अहमदनगर जिल्ह्यातील विविध भागामध्ये विशेषत: पाथर्डी तालुक्यात सध्या बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे.

नागरिक बिबट्याच्या धास्तीने भयभीत झालेले आहेत. मढी येथे तीन वर्षीय श्रेया साळवे या चिमुकलीला बिबट्याने जीव घेतला आहे. ही घटना ताजी असतानाच केळवंडी गावांमध्ये आठ वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून त्याला देखील जीवे मारले. तर शिरपूर मधील सार्थक बुधवंत ह्या बालक देखील बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला आहे.

अशाप्रकारे पाथर्डीत तीन निष्पाप बालकांना जीव गमवावा लागला आहे. एका गावांमध्ये तीन दिवस वन विभागाने सापळा तयार करून देखील बिबट्या पकडण्यात आलेला नाही. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने या घटनांचे सत्र सुरु होण्यापुर्वीच बिबट्या पकडून ताडोबा जंगलात सोडण्याची तसेच गस्तीपथक वाढवावेत,

पिंजरे व मनुष्यबळ वाढवण्याची मागणी केली होती. मात्र बिबट्याने कोणत्या मानवी वस्तीत काय नुकसान केले? याचे पुरावे दाखवा असा प्रश्‍न वन विभागाच्या अधिकार्‍याने केला होता. या मागणीकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्याने अशाप्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सध्या जिल्ह्यातील बिबट्यांच्या सर्व घटना पाहता ते मानवी वस्तीत घुसून हल्ले करीत आहे. पोटाच्या लेकराला बिबट्या ओढून घेऊन जातो. आईच्या वेदना व आक्रोशाची किंचाळी वन विभागास ऐकू येत नाही. बिबट्याला पकडून वन विभागाने जंगलात सोडले तर तो लोकवस्तीमध्ये येतोच कसा? हा प्रश्‍न नागरिकांच्या मनामध्ये घुटमळतोय.

व अशा हिंसक घटना घडणार नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. बिबट्या पकडून परत जंगलात सोडल्यास तो पुन्हा लोकवस्तीत येणार नाही याची खात्री कोणी देऊ शकत नाही. वारंवार बिबट्या मनुष्य वस्तीत शिरत असल्याने तंत्रज्ञानाचा उपयोग करुन त्यांना रेडिओ कॉलर बसविण्याची गरज आहे.

मनुष्य वस्तीत येणार्‍या बिबट्यांना प्रतिबंध करण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्या व बिबट्यांना रेडिओ कॉलर बसविण्याची मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीकडे देखील दुर्लक्ष केल्यास वन विभागाच्या कार्यालयात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24