पुणे – शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्षामुळे राज्यात अद्यापही सत्तास्थापन झालेली नाहीये. मुख्यमंत्रिपदावरुन दोन्ही पक्षांत झालेल्या तिढ्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसोबत संपर्क साधत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
तत्पूर्वी भाजपचे काही नेते म्हणतात की भाजप शिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही. यातच काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पुण्यात पार पडली.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह इतरही प्रमुख नेते उपस्थित होते.
कोअर कमिटीच्या या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. राज्यात लवकरच नवं सरकार निर्माण व्हावं यावरही चर्चा झाली.
बैठक पार पडल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संपर्क साधला असता, नवाब मलिक यांनी म्हटलं, बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर झाली चर्चा, राज्यात लवकरच नवं सरकार निर्माण झालं पाहिजे. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आघाडी करुन निवडणूक लढलो होतो त्यामुळे आता पुढील निर्णय काँग्रेससोबत चर्चा करुन घेण्यात येईल.
नवाब मलिक यांनी पुढे म्हटलं की, आज दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक होणार आहे. तर मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकत्र बैठक करुन पर्यायी सरकार स्थापनेबाबत निर्णय घेतील.
तिन्ही पक्षांतील नेत्यांनी एकत्र येत किमान समान कार्यक्रम तयार केला असून यावर आता तिन्ही पक्षांचे प्रमुख अंतिम निर्णय घेणार आहेत.