केंद्र सरकारने घेतलेल्‍या महत्‍वपुर्ण निर्णयांमुळे सहकारी साखर कारखानदारीचे भविष्‍य उज्‍वल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  व्‍यापारी हितापेक्षा शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने घेतलेल्‍या महत्‍वपुर्ण निर्णयांमुळे सहकारी साखर कारखानदारीचे भविष्‍य उज्‍वल ठरेल असा विश्‍वास भाजपाचे जेष्‍ठनेते माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना १२ लाख टन उसाच्‍या गाळपाचे उद्दीष्‍ठ पुर्ण करणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. पद्मश्री डॉ.वि‍ठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या ७१ व्‍या गळीत हंगामाचा शुभारंभ आ.राधाकृष्‍ण विखे पाटील आणि सौ.शालिनी विखे पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.

माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झालेल्या या कार्यक्रमास खा.डॉ.सुजय विखे पाटील, गणेश कारखान्‍याचे चेअरमन मुंकूदराव सदाफळ, डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्‍याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे, प्रवरा बॅंकेचे चेअरमन बाळासाहेब भवर, सभापती सौ.नंदाताई तांबे, चेअरमन नंदू राठी,

व्‍हा.चेअरमन विश्‍वासराव कडू, दत्‍तात्रय ढुस, सौ.गिताताई थेटे, सौ.रोहिणी निघुते, कारखान्‍याचे कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे आदि याप्रसंगी उपस्थित होते. आपल्‍या भाषणात आ.विखे पाटील म्‍हणाले की, यापुर्वीच्‍या सरकारने घेतलेल्‍या व्‍यापारी धार्जिण्‍या धोरणामुळे सारख कारखानदारीला आव्‍हाणात्‍मक परिस्थितीला सामोरे जावे लागले.

मात्र देशात प्रथमच साखर धंद्याबाबत केंद्र सरकारने शेतक-यांच्‍या हिताचे निर्णय केल्‍यामुळे साखर कारखानदारी समोरील अडथळ दुर होण्‍यास मदत झाली आहे. शेतक-यांना एफआरपी प्रमाणे भाव देतानाच साखर विक्रीची किंमतसुध्‍दा निश्चित करण्‍याचे धोरण या देशात प्रथमच ठरविले गेले. यापुर्वी इथेनॉलचे करार एक, दोन वर्षाचेच होत होते.

यातून फक्‍त कंपन्‍या मोठ्या झाल्‍या. केंद्र सरकारने मात्र आता ५ वर्षांच्‍या कराराचे निश्चित असे धोरण घेतल्‍याने साखर उद्यागाच्‍या अर्थकारणाला स्थिरता येईल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला. निसर्गाच्‍या कृपेने या वर्षीच्‍या हंगाम सकारात्‍मक‍ होण्‍याची चांगली चिन्‍ह असल्‍याचे समाधान व्‍यक्‍त करुन आ.विखे पाटील यांनी सांगितले की,

पाण्‍याची उपलब्‍धता यावर्षी मुबलक आहे. जायकवाडीलाही मोठ्या प्रमाणात पाण्‍याचा विसर्ग झाल्‍याने आता पाणी सोडण्‍याचा प्रश्‍न राहीला नाही. यापुर्वी पाण्‍यासाठी संघर्ष करावेच लागले, याचा परिणाम साखर कारखानदारीला भोगाचा लागला, ऊसाचे क्षेत्र घटले, ही परिस्थिती आता बदलली आहे.

उपलब्‍ध पाण्‍यावर उसाचे क्षेत्र वाढविणे हेच उदिष्‍ट आता संचालक,कामगारांसह ऊस उत्‍पादक शेतक-यांनी ठेवले पाहीजे. कारखान्‍याच्‍या माध्‍यमातून चालविण्‍यात येणा-या उपसा सिंचन योजनांचा उपयोगही ऊसाच्‍या पि‍कासाठीच करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.

कारखान्‍यामध्‍ये मोठ्या प्रमाणात करण्‍यात आलेल्‍या आधुनिकीकरणामुळे गाळपाची क्षमताही वाढली आहे. शेतकी विभागात नव्‍याने विकसीत करण्‍यात आलेल्‍या यंत्रणांमुळे १२ लाख टन गाळपाचे नियोजन कारखाना व्‍यवस्‍थापणाने केले असल्‍याची माहीती त्‍यांनी दिली.

माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांनी सहकारी साखर कारखानदारीच्‍या वाटचालीचा आढावा घेवून यावर्षीच्‍या हंगामासाठी केलेले नियोजन पाहाता इतर कारखान्‍यांप्रमाणेच डॉ.विखे पाटील कारखानाही गाळपाचे आपले उदिष्‍ठ पुर्ण करेल असा विश्‍वास व्‍यक्‍त केला. व्‍हाईस चेअरमन विश्‍वासराव कडू यांनी प्रास्‍ताविक केले.

याप्रंसगी भाजपाचे तालुका अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर, जिल्हा उपाध्‍यक्ष गणेश राठी, जिल्‍हा सरचिटणीस सुनिल वाणी, जिल्‍हा सचिव अनिल भनगडे, भटके विमुक्‍त आघाडीचे जिल्‍हाध्‍यक्ष विठ्ठल राऊत, श्रीरामपूर तालुका अध्‍यक्ष बबनराव मुठे, शहर अध्‍यक्ष मारुती बिंगले यांच्‍यासह विविध संस्‍थांचे संचाल‍क, पदाधिकारी,शेतकरी, कामगार उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24