मुंबई :- राज्य शासनाने 3 मेपर्यंत घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत शेतीशी संबधित विविध बाबींना सूट दिली आहे. तसेच सर्व प्रकारच्या माल आणि वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली असून बसून खाण्याची व्यवस्था नसलेली मिठाईची दुकाने, नाष्ट्याचे पदार्थ आणि फरसाणाची दुकाने यांनाही सूट देण्यात आली आहे.
कोविड-19 (कोरोना विषाणू) चा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्य शासनाने सुरुवातीला 30 एप्रिलपर्यंत आणि नंतर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 3 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत ज्या बाबींना सवलत देण्यात आली आहे, त्या याविषयी यापूर्वी 25 मार्च रोजी आणि 15 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली होती. त्यामध्ये आता नव्याने काही बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
– शेती उत्पादनांची खरेदी करणाऱ्या (किमान हमी दरासह) संस्था, विशेषतः कापूस आणि तूर डाळ यांची खरेदी करणाऱ्या संस्था
– कृषी उत्पन्न बाजार समिती संचालित किंवा राज्य शासनाने अधिसूचित केलेली मंडी. तथापि जागेवरच्या खरेदीस प्रोत्साहन दिले जावे
– शेतकऱ्यांकडून आणि शेतमजुरांकडून करण्यात येणारी शेतीची कामे
– मासेमारी, मत्स्य उद्योगासाठी लागणारे खाद्य आणि व्यवस्था, शित साखळी, विक्री व पणन, मत्स्यपालन, व्यावसायिक मत्स्यकेंद्र, खाद्य केंद्र, मासे, कोळंबी वाहतूक आणि अन्न उत्पादने, मत्स्य बीज आणि खाद्य, यासाठी काम करणारे कामगार
– पेसा म्हणजेच पंचायत (अनुसुचित क्षेत्रावर विस्तारीत) कायदा, 1996, नॉन पेसा वन हक्क कायदा क्षेत्रातील किरकोळ वन उत्पादने( साठा, प्रक्रिया, वाहतूक आणि विक्री), वने व बिगर वने क्षेत्रातील तेंदू पत्ता वेचणी, साठा आणि गोदामापर्यंतची वाहतूक
– जंगलात वणवे टाळण्यासाठी पडलेली लाकडे वेचणे, तात्पुरत्या विक्रीसाठीचे डेपो
वरील सर्व परवानगी लॉकडाऊनमधील नियमांचे पालन करण्याच्या अटीवर देण्यात येत आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेच्या प्रमुखाची अथवा दुकानाच्या मालकाची राहील. जिल्हा यंत्रणांनी याचे काटेकोर पालन होत असल्याची खात्री करण्याचे आदेश या अधिसूचनेद्वारे देण्यात आले आहेत.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®