राज्यातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत आता थांबवली जाणार आहे. परीक्षा योग्य पद्धतीने पार पडली आहे का, उत्तरपत्रिका आणि गुणांकन बरोबर आहे का, याची तपासणी आता शिक्षण मंडळ आणि शिक्षणाधिकारी करतील. यासाठी सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका जतन करून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शालेय शिक्षणात नवीन बदल
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून पाचवी आणि आठवीच्या परीक्षांवर अधिक नियंत्रण ठेवले जाणार आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मे आणि जून महिन्यात फेरपरीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेतही जर विद्यार्थी नापास झाला, तर त्याला पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार नाही.

ढकलपास बंद
गेल्या काही वर्षांपासून ढकलपास पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड कमी होत चालली होती. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार विद्यार्थ्यांना नापास केले जात नव्हते. मात्र, नवीन शासन निर्णयानुसार विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर आधारित प्रमोशन दिले जाणार आहे.
गुणवत्ता ओळखण्याची संधी
विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करण्याची सवय लागेल, परीक्षेचे महत्त्व वाढेल आणि शैक्षणिक दर्जा सुधारेल. पूर्वी चौथी आणि सातवीच्या परीक्षा बोर्ड पद्धतीने घेतल्या जात होत्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय आणि स्पर्धात्मकता अधिक होती. मात्र, नंतर श्रेणी पद्धती आल्यामुळे गुणवत्ता ओळखण्याची संधी कमी झाली होती.
गुणवत्तेला प्राधान्य
आता शालेय शिक्षणात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, गुणवत्तेला प्राधान्य देऊन परीक्षा पारदर्शक करण्यासाठी शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून उत्तरपत्रिका फेरतपासणी केली जाणार आहे. यामुळे शिक्षकांनी गुणांकन योग्यरित्या केले आहे का, याची शहानिशा होईल.विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात परीक्षा हा महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे.
शिक्षणाचा दर्जा उंचावणार
परीक्षांमुळे त्यांच्या अभ्यासाची व्याप्ती आणि बौद्धिक विकासाचे मापन होऊ शकते. म्हणूनच सरकारने ढकलपास पद्धती बंद करून फेरतपासणी आणि फेरपरीक्षा अनिवार्य केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आता स्वतःच्या गुणवत्ता सुधारण्याची संधी मिळेल, शिक्षणाचा दर्जा उंचावेल आणि भविष्यातील आव्हानांसाठी ते अधिक सक्षम होतील.