महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘हे’ गीत गावे लागणार…

राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत सक्तीने वाजवले जाईल, असा स्पष्ट आदेश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे. या नवीन आदेशाची आता राज्यभर चर्चा रंगली आहे. 

Published on -

Maharashtra State Song | राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत सक्तीने वाजवले जाईल, असा स्पष्ट आदेश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे. या निर्णयामागचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाबाबत अभिमान जागवणे आणि एकात्मतेची भावना दृढ करणे हा आहे. राज्य सरकारने या गीताच्या अनिवार्यतेसंदर्भात आधीही सूचना दिल्या होत्या, मात्र आता त्याची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करण्यात येणार आहे.

मागील वर्षी शाळांमध्ये सक्तीने हे गीत वाजवले जावे, याबाबत आदेश दिले गेले होते. यंदा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी त्या निर्णयाची व्याप्ती वाढवत, केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डांच्या शाळांनाही या आदेशात सामील केले आहे. राज्याच्या शिक्षण सहसंचालक (प्राथमिक) रमाकांत काठमोरे यांनी सर्व विभागीय उपसंचालकांना या आदेशाच्या अंमलबजावणीसंदर्भात जबाबदारी सोपवली आहे.

राज्यगीत गाणे बंधनकारक 

या गीताची ओळख अधिक सखोल आहे. ‘काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी…’ अशा ओळींमधून राज्यातील नागरिकांची निर्भीड वृत्ती आणि अभिमान व्यक्त केला जातो. हे गीत प्रसिद्ध गीतकार राजा बढे यांनी लिहिलं असून, श्रीनिवास खळे यांचे संगीत आणि शाहीर साबळेंचा आवाज यामुळे ते आजही लोकांच्या मनात घर करून आहे.

शालेय वेळापत्रकानुसार, दररोज सत्र सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत, परिपाठ, प्रार्थना, प्रतिज्ञा यांसोबत राज्यगीतही गायले जाणे बंधनकारक आहे. यापूर्वी सर्व शाळांना या संदर्भात वेळोवेळी सूचित करण्यात आले होते, मात्र अनेक शाळांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे शिक्षण विभागाच्या निरीक्षणात आले आहे. त्यामुळे आता जिल्हानिहाय अहवाल मागवण्यात येणार आहे.

शिक्षण विभाग ठेवणार नजर- 

राज्य शिक्षण विभागाने स्पष्ट आदेश दिले आहेत की, सर्व माध्यमांच्या, सर्व प्रकारच्या व्यवस्थापनांतील शाळांमध्ये राज्यगीत गायलेच पाहिजे. यावर विभागीय उपसंचालक कटाक्ष ठेवणार असून, प्रत्येक शाळेने हे गीत वाजवले जाते की नाही, याचा तातडीने अहवाल सादर करणे आवश्यक आहे.

या निर्णयामुळे आता राज्यातील सर्व शाळांमध्ये सकाळच्या सत्राची सुरुवात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गर्जना करणाऱ्या गीताने होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये राज्याविषयी अभिमानाची भावना वाढवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!