अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2021 :- राज्यातील करोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता निर्बंध कठोर करण्यात आले आहे. त्यानुसार दि. 25 डिसेंबर 2021 पासून रात्र 9 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.(Pandharpur Vitthal Temple)
याचाच परिणाम म्हणून यापुढे रात्री 9 वाजेनंतर श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. तसेच करोडो वारकर्यांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरही रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत दर्शनासाठी बंद राहणार आहे.
पुन्हा एकदा देशावर कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. करोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्यावतीने दिनांक 5 एप्रिल 2021 पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले होते.
परंतु राज्य शासनाने 7 ऑक्टोबर 2021 पासून काही अटी-शर्तीवर धार्मिकस्थळे खुली करण्याचे आदेश दिलेले होते. आता पुन्हा राज्यातील करोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत.
यामध्ये रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी लागू केलेली आहे. त्याअनुषंगाने संस्थानच्यावतीने सकाळी 6 ते रात्री 9 यावेळेत भाविकांना श्रींच्या दर्शनासाठी समाधी मंदिर खुले राहणार आहे.
तसेच रात्री 10.30 वाजताची श्रींची शेजारती व पहाटेची 4.30 वाजताची काकड आरती नियमित होणार असून याकरीता भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.
राज्यात जमावबंदी लागु असल्यामुळे संस्थानचे श्री साईप्रसादालय, लाडू विक्री काऊंटर, कॅन्टींन आदी सुविधा रात्री 9 वाजेनंतर बंद राहणार आहेत. याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी.