महाराष्ट्र

मह्त्वाची बातमी ! दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- कोविड-19 मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्यात येत आहेत.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येऊन त्यांना 2021-22 या वर्षाकरता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत.

तसेच इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन 2021-22 करता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत,

असे निर्देश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना देण्यात आल्याचे मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. ही सवलत केवळ सन 2021-22 च्या परीक्षेकरताच देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office