अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा देताना हिवाळी अधिवेशनात दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीची घोषणा केली.
शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीचा विचार करूनच दोन लाखांपर्यंतची पीक कर्जमाफी देण्यात आली आहे. दोन लाखांच्या वरीलही शेतकऱ्यांची कर्ज आहेत. त्याचाही विचार करण्याचा आमच्या सरकारचा शब्द आहे.
त्याचबरोबर नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठीही योजना आणणार, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून सरकार काम करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मराठवाड्यात वसंतदादा शुगर इ्स्टिटट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासन तातडीने निर्णय घेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इ्स्टिटट्यूट संस्थेच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते.
ठाकरे म्हणाले, ‘‘सहकार आणि राजकारण क्षेत्र वेगळे असू शकत नाही. सहकार क्षेत्राने राज्याला अनेक दिग्गज नेते दिले. शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असताना राज्य सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही.’’ साखर उद्योगाला सक्षम करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.