महाराष्ट्र

एका वर्षात १३ लाखांपेक्षा जास्त महिला झाल्या ‘लखपती दीदी’ – एकनाथ शिंदे !

Published by
Ahmednagarlive24 Office

राज्यात मागील एक वर्षाच्या कालावधीत १३ लाखांपेक्षा जास्त महिला ‘लखपती दीदी’ झालेल्या आहेत. ग्रामीण जनतेच्या जीवनमानाशी संबंधित असलेल्या अनेक योजना ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून राबवल्या जातात.

या योजनांची माहिती देणारी ‘निर्धार ग्रामीण विकासाचा’ ही माहिती पुस्तिका सर्वांना उपयुक्त अशी आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवन येथे पुस्तक प्रकाशनावेळी व्यक्त केले.

पुस्तक प्रकाशनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांसह इतर मंत्री देखील उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, केंद्र शासन व राज्य सरकारच्या आवास योजना, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ अभियान हा कार्यक्रम राज्याच्या ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब महिलांचे दारिद्र्य निर्मूलन होऊन त्या सर्व आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी राबवला जात आहे.

या कार्यक्रमामुळे ग्रामीण महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी चालना मिळत आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीचे जीवनमान उंचवावे, या हेतूने ग्रामविकास विभाग काम करत आहे.

ग्रामीण आवास योजना ते महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबवण्यात येणारे ‘उमेद’ अभियान यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामविकास विभाग ग्रामविकास मंत्री यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबवत आहे.

गावातील दळणवळण यंत्रणा चांगली असावी, यासाठी देखील उत्कृष्टपणे काम होत आहे. तसेच ग्रामविकास विभागामार्फत विविध योजना राबवल्या जात आहेत. या सर्व योजनांची माहिती ‘निर्धार ग्रामीण विकासाचा’ पुस्तिकेत आहे, ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

गावांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन तत्पर !

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, राज्याच्या विकासात ग्रामविकास विभागाचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. ग्रामीण गृहनिर्माण महाआवास अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यासह सर्व योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. प्रत्येक गाव समृद्ध व्हावे यासाठी गावातील रस्ते दर्जेदार करून हजारो गावे मुख्य रस्त्यांना जोडली जात आहेत.

बचतगटांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले आहेत. ग्रामस्थांचे जगणे सुसह्य होण्यासाठी सर्व योजना गतीने राबवण्यावर शासनाचा भर आहे. ‘आषाढी वारी ‘मध्ये वारकऱ्यांना काही त्रास होऊ नये यासाठी ग्रामविकास विभाग सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतही भरीव निधी उपलब्ध करून दिला जात आहे. गेल्या दोन वर्षांत या शासनाने ग्रामविकासासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती या पुस्तिकेत आहे, असेही मंत्री महाजन यावेळी म्हणाले.

Ahmednagarlive24 Office