अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- अखेर ज्या गोष्टीची भीती होती ती झालीच म्हणावी लागेल. कारण दोन दिवसांपासून जामखेड तालुक्यातील दिघोळ याठिकाणी तीन दिवसात ४२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी या गावात अत्यावश्यक सेवा वगळता पंधरा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.
जामखेड तालुक्यासाठी चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे सध्या जामखेड तालुक्यात एकूण ४५ कोरोना रुग्ण हे आरोळे कोव्हिड सेंटर येथे उपचार घेत आहेत. मागील दोन महिने थंडावलेल्या कोरोनाने जामखेड तालुक्यात पुन्हा एकदा सक्रीय होऊ लागला आहे.
विशेष म्हणजे कोरोना बाधितांची संख्या ही शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त आढळुन येत आहेत. ग्रामीण भागातील दिघोळ येथे कोरोनाचा उद्रेक पहायला मिळाला असून गेल्या दोन दिवसांत ८८ जणांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या यामध्ये पंधरा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
तसेच पाडळी गावात ९ तर सावरगाव या ठिकाणी ४ रुग्ण आढळून आले आहेत. दिघोळ या गावी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी हॉटस्पॉट घोषित केले असुन, पुढील पंधरा दिवस अत्यावश्यक सेवा वगळता कडक लॉकडाउन करण्यात आला आहे.
तसेच या ठिकाणी सनियंत्रीत अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी हे काम पहाणार असुन गावातील रस्ते बंद करून एकच रस्ता ठेवण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू या शासकीय यंत्राने कडुन योग्य ते शुल्क अकारुन पोहच करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
जामखेड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होऊ नये याकरिता नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. मागच्या वर्षीच्या अनुभवातून जनतेने सजग राहणे आवश्यक आहे. अन्यथा जामखेड शहर व तालुक्यात कोरोना पुन्हा वेगाने आपले पाय पसरवले हे मात्र निश्चित.