निवासी डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात ; ४० डॉकटर कोरोनाग्रस्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई: कोरोनाग्रस्त लोकांवर उपचार करण्याचे फार मोठे कार्य वैद्यकीय पथक करत असते. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी वैद्यकीय प्रशासन अहोरात्र झगडत आहे. परंतु आता हे डॉक्टरच कोरोनाच्या विळख्यात सापडत चालले आहेत.

एकट्या लो. टिळक रुग्णालयातील ४० निवासी डॉक्टरांना करोनाचा संसर्ग झाला आहे. हे रुग्णालय कोरोना रुग्णालय नसले तरीही तेथे सध्या ३५० करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

करोना संसर्ग टाळण्यासाठी केलेल्या नियोजनानुसार वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये काम करणारे हे डॉक्टर रात्री हॉस्टेलमध्ये मात्र एकाच खोलीत राहतात.

त्यातूनही करोनाचा संसर्ग बळावण्याची शक्यता निवासी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ऑर्थोपेडिक विभागातील ज्या डॉक्टरांना संसर्ग झाला आहे, ते देखील एकाच खोलीत राहतात.

त्यामुळे करोनाचे संकट टळेपर्यंत निवासी डॉक्टरांनी ही व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी करावी, अशी विनंती रुग्णालय प्रशासनाला केली आहे.

मात्र, त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. याबाबत, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्याकडे विचारणा केली असता, काही निवासी डॉक्टरांना करोनाचा संसर्ग झाला असल्याचे त्यांनी मान्य केले.

त्यांना उपचारांसाठी सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये पाठवण्यात येते, असेही त्यांनी सांगितले. संसर्ग झालेल्या डॉक्टरांना सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येते.

पाचव्या व सातव्या दिवशी तपासणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आलेल्या डॉक्टरांना विलगीकरणाची सुविधा दादर येथील प्रीतम रुग्णालयामध्ये देण्यात आली आहे.

दहा दिवसाच्या विलगीकरणानंतर हे डॉक्टर पुन्हा रुग्णालयामध्ये रुजू होतात. मात्र, ड्युटीवर असलेले डॉक्टर वेगवेगळ्या व़ॉर्डमध्ये काम करून पुन्हा हॉस्टेलमध्ये एकाच रुममध्ये राहतात. त्यांच्यापैकी कुणी पॉझिटिव्ह आले तर या डॉक्टरांनाही लागण होते.

अहमदनगर लाईव्ह 24