महाराष्ट्र

Suger Price : दिवाळीमुळे साखरेच्या मागणीत वाढ ! दर वाढणार का ?

Published by
Ahmednagarlive24 Office

Suger Price : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर साखरेला मागणी वाढली आहे. मात्र, वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा कोटा वाढवून दिला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत साखरेचे दर स्थिर राहतील, असा अंदाज आहे. मात्र, यंदा उत्पादन कमी निघण्याचा अंदाज असल्याने दिवाळीनंतर दर वाढतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

साखरेचे २०२३ २४ च्या आगामी हंगामाचे उत्पादन ३० ते ३५ टक्क्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी देशात ३१५ लाख मेट्रिक टन इतके उत्पादन झाले होते. तर यंदा त्यामध्ये २८० ते २८५ लाख मेट्रिक टन इतके उत्पादन हाती येण्याचा अंदाज आहे.

सध्या कारखान्यावर साखरेचे दर ३६००- ३६५० प्रतिक्विंटल इतके आहेत. येत्या जानेवारी महिन्यात ३८५० ते ३९०० रुपये प्रतिक्विंटल असे दर राहतील, असा अंदाज आहे. सद्यःस्थितीत घाऊक बाजारात ३९५० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल असे भाव आहेत तर किरकोळ बाजारात ४१ ते ४२रुपये प्रतिकिलो दराने साखरेची विक्री केली जात आहे.

यंदा उसाची लागवड जास्त प्रमाणात झाली आहे. मात्र, पाऊस कमी असल्याने साखरेचा उतारा कमी मिळेल, असा अंदाज आहे. तसेच, पावसाअभावी अपेक्षित उसाची वाढ होत नसल्याने उत्पादन घटेल आणि याच कारणामुळे यंदा शासन साखरेच्या निर्यातीला परवानगी देणार नाही, असा अंदाज साखरेचे निर्यातदार मुकेश गोयल यांनी व्यक्त केला.

स्थानिक बाजारपेठेत २६५- २७५ लाख टन इतकी मागणी असते. ती दरवर्षी मागणी वाढत जाते. त्यामुळे यंदा साखरेचे उत्पादन जेवढे अपेक्षित आहे, तेवढे झाल्यास ती साखर निर्यातीला पुरणार नाही व जागतिक बाजारपेठेत असणाऱ्या साखरेचा फायदा भारताला घेता येणार नाही

शासन इथेनॉलवर जोर देत असल्याने त्यामुळे उसापासून सर्वाधिक इथेनॉल निर्मिती होत आहे. गेल्यावर्षी इथेनॉलसाठी २८ ते ३० लाख टन गाळप झाले. यावर्षी ३५ ते ४० लाख टन ऊस गाळप होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उसाची कमतरता असल्याने साखरेचे दर वाढतील आणि तेजी कायम राहील. त्यामुळे शासनाने तेजी कमी करण्याचे प्रयत्न केले तरीही तेजी राहील, असा अंदाज आहे.

सद्यःस्थितीत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घाऊक बाजारात साखरेला मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवाळीपर्यंत अशीच मागणी राहील. शासनाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा साखरेचा कोटा वाढविला आहे. त्यामुळे दर स्थिरच राहतील. – मुकेश गोयल, साखरेचे निर्यातदार, पुणे

गेल्या दोन ते तीन महिन्यात प्रतिक्विंटलमागे १०० रुपयांनी वाढ झाली आहे. यंदा उत्पादन कमी निघण्याचा अंदाज आहे. मागणी ही दिवसेंदिवस वाढतच असते. त्यामुळे जानेवारी महिन्यादरम्यान तेजी येण्याचा अंदाज आहे. -राजेश ललवाणी, साखरेचे व्यापारी, पुणे

११ नोव्हेंबरपासून साखरेचा हंगाम सुरू होणार आहे. यंदा उत्पादन कमी होणार असल्याने कारखाने साखर कमी दरात विकणार नाहीत. महाराष्ट्रातून ८५ ते ९० लाख टन उत्पादन निघेल, असा अंदाज आहे. जानेवारीत दर वाढतील. – अमित जैन, साखरेचे व्यापारी, पुणे

राज्यातील बहुतांश कारखाने हे १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. साखर हा शासनासाठी संवेदनशील विषय आहे. कारखाने सुरू झाल्यास आवक वाढेल. परिणामी, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये काही प्रमाणात दर कमी होतील. – संजय रायसोनी, साखरेचे व्यापारी, पुणे

साखरेला मागणी वाढली असल्यामुळे काही किरकोळ स्वरुपात भाव वाढतील, असा अंदाज आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत यंदा भाव कमी होणार नाहीत. उत्पादनच कमी असल्याने भाव तेजीतच राहतील.- मनोज गुप्ता, साखरेचे व्यापारी, पुणे

Ahmednagarlive24 Office