Maharashtra News : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची कोलांटउडी आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली तरी विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी एकजूट आहे.
लोकसभा निवडणुकीत आम्ही बहुमताचा २७२ चा आकडा पार करू, असा विश्वास काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विरोधकांवर केले जात असलेले भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे असल्याची टीका त्यांनी केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांनी वृत्तसंस्थेच्या मुख्यालयात संपादक आणि पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना ‘इंडिया’ आघाडी सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला.
‘इंडिया’ आघाडी एकजुटीने २७२ जागांचा बहुमताचा आकडा सहज पार करेल आणि आम्ही भाजपाला सत्तेबाहेर फेकू, असा दावा रमेश यांनी केला. निवडणूक रोखे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेसंबंधीच्या कारवाईवरून त्यांनी भाजपाला लक्ष्य केले. निवडणूक रोखे आणि कंपन्यांना कंत्राट देणे याचा एकमेकांशी संबंध आहे.
चार हजार कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांचा थेट संबंध चार लाख कोटी रुपयांच्या कंत्राटाशी संबंधित आहे, असा गंभीर आरोप रमेश यांनी लावला. भाजपासाठी अनेक कंपन्यांनी खरेदी केलेले
चार हजार कोटींचे रोखे थेट कंत्राट मिळवण्यासाठी आणि आपल्याविरोधात केंद्रीय तपास संस्थांनी सुरू केलेल्या कारवाईशी संबंधित आहेत. याबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचे रमेश म्हणाले. त्याचबरोबर मोदींकडून विरोधकांवर केले जात असलेले भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे असल्याची टीका त्यांनी केली.