Maharashtra News : गावपुढाऱ्यांनी शाळेतील मोबाईल वापर बंद करुन प्रत्येक गावामध्ये कमिटी स्थापन करुन गावाकडे लक्ष द्यावे. गेल्या ३ महिन्यात २२०० मुलींचे धर्मांतर झाले असून धर्माचे वाटोळे झालेले आहे.
हा सगळा तमाशा सोशल मीडिया व मोबाईलच्या अति वापरामुळेच होत असल्याचे प्रतिपादन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले.
तालुक्यातील भोकर येथे रेणुका माता नवरात्र उत्सवानिमित्ताने काल सोमवारी दुसऱ्या माळेच्या किर्तनात समाज प्रबोधन करताना ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आपल्या मुला-मुलींवर चांगले संस्कार करा.
आजच्या काळात मुलींना ब्लॅकमेलींग करुन धर्मांतरांचे प्रकार वाढलेले आहे. मुलीही बापाच्या विरोधात उठतात व बापाला संपवतात. हा सगळा तमाशा मोबाईलमुळेच होत असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, या युगात देवाचे अनंत आवतार असून देवीच्या शक्तीची ताकद महान आहे. म्हणुन धर्म, संस्कृती टिकवा. विश्वातला सर्वात पवित्र ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे.
सद्गुरू नारायणगिरी महाराज व महंत भास्करगिरी महाराज हे देवाने पाठवलेले भगवंताचे खरे दास असल्याचे इंदोरीकर महाराजांनी यावेळी स्पष्ट केले. या किर्तन प्रसंगी पंचक्रोशीतील हजारो नागरीकांनी हजेरी लावली होती.