Maharashtra News : अपत्य प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख हे काल बुधवारी दि.८ रोजी येथील न्यायालयात गैरहजर राहिले. त्यामुळे या खटल्याची पुढील सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
अपत्य प्राप्तीबाबत वादग्रस्त विधान केल्याने इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात २०२० साली पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अॅड. रंजना गवांदे यांनी देशमुख यांच्या विरोधात संगमनेर येथील न्यायालयात तक्रार केली होती.
ही केस सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही केस पुन्हा संगमनेर न्यायालयात पाठवली.संगमनेर न्यायालयाने (दि. १३) सप्टेंबर रोजी ही केस पुन्हा सुनावणीसाठी घेतली.
मागील महिन्यात निवृत्ती महाराज देशमुख यांना समन्स पाठवून न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र ते न्यायालयात हजर राहिले नाही. न्यायालयात हजर होण्यासाठी काल बुधवारची तारीख देण्यात आली होती.
मात्र ते न्यायालयात आजही हजर राहिले नाहीत. त्यामुळे या खटल्याची पुढील सुनावणी आता २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. इंदुरीकर यांना न्यायालयाने समन्स बजावले होते. मात्र ते अनुपस्थितीत होते. जामीन मिळवण्यासाठी त्यांना स्वतःला हजर राहावे लागेल, असे अॅड. गवांदे यांनी सांगितले.