Ganeshotsav 2023 : गणपती सणासाठी मुंबईकरांची लगबग सुरू झाली आहे. यंदा शाडूच्या मातीच्या किमती, पर्यावरणपूरक रंग आणि इतर सजावटीच्या साहित्याच्या किमती वाढल्याने मूर्तीच्या किमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना महागाईमुळे अधिकचा आर्थिक बोजा सहन करवा लागणार आहे. गणपती उत्सवासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी उरला असल्याने मूर्तिकारांचे आपल्या कार्यशाळेत जोरदार काम सुरू आहे.
अनेक मूर्ती तयार करून त्यांना रंगरंगोटीसाठी सज्ज केले जात आहे. वसई-विरार महापालिकेने या वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले असले तरी मूर्तीच्या संदर्भात अद्याप कोणतेही निर्णय जाहीर केले नाहीत.
यामुळे मूर्तिकारांत संभ्रम कायम आहे, तर दुसरीकडे मुंबई महापालिकेने ४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींना पीओपी वापरण्याची परवानगी दिली आहे. यामुळे वसई-विरार महापालिकेचा निर्णय जाहीर होत नाही तोवर मूर्तिकार काही ठरावीक मूर्तीची ऑर्डर घेत आहेत.
पण यंदा माती, रंग, सजावटीच्या साहित्याच्या किमती वाढल्याने मूर्तीच्या किमतीत १० ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. असे असले तरी शाडू मातीच्या मूर्तीची मागणी वाढत असल्याची माहिती वसईतील मूर्तिकारांनी दिली आहे.
वसई येथील मूर्तिकार तुषार बावस्कर मागील १० वर्षांपासून गणेशमूर्ती बनवण्याचे काम करत आहेत. बावस्करांनी सांगितले की, मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी १० टक्के मातीच्या किमतीत वाढ झाली आहे. मुख्यत्वे ही माती गुजरातवरून आणली जाते. त्यात इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे.
त्यात कामगारांचे मानधन सुद्धा वाढले आहे. रंग आणि इतर सजावटीचे साहित्य मागील वर्षीच्या तुलनेत ५ ते १० टक्क्यांनी वाढले आहे. यामुळे यावर्षी मूर्तीच्या किमतीत साधारण ७०० ते १००० रुपयांची वाढ झाली आहे. त्यात मागणीनुसार तयार केल्या जाणाऱ्या मूर्ती अधिक महाग आहेत.
नालासोपारा येथील मूर्तिकार विजय वैती यांनी माहिती दिली की, नागरिकांचा पर्यावरणपूरक मूर्तीकडे अधिक कल आहे. त्यात कोरोना काळात नागरिकांना सण साजरा करण्यात अनेक निर्बंध असल्याने मागील वर्षीपासून मातीच्या मूर्तीची मागणी वाढली आहे.
किमती वाढल्या असल्या तरी नागरिक आवडीने आपल्या पसंतीची मूर्ती तयार करण्याची मागणी करत आहेत. पण किमती वाढल्याने मूर्ती शिल्लक राहण्याची भीती असल्याने मूर्तिकार आगाऊ नोंदणीनुसार मूर्ती तयार करत आहेत.
सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याने वेळ कमी असल्याने नागरिकांचा आपल्या पसंतीची मूर्ती बनवण्याकडे कल दिसत आहे. पण यावर्षी मूर्तीच्या किमती वाढल्याने त्यांना आपले बजेट वाढवावे लागत आहे. यामुळे यावर्षी अधिकचा आर्थिक बोजा सहन करून सण साजरा करावा लागणार आहे.