सध्या मंकीपॉक्स आजाराची चांगलीच चर्चा सध्या सुरु आहे. जगभरात अनेक ठिकाणी याची साथ दिसून आल्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनेतर या साथीस जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केल्याने जास्तच चर्चा व्हायला लागली. मंकीपॉक्स संसर्गाचा वेग व रोगाची तीव्रता पाहता काही मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने पारीत केल्या आहेत.
सर्व राज्यांना या सूचना दिलेल्या असून त्यांचा अवलंब करण्याचे आदेश देण्यात आलेत.
मंकीपॉक्स म्हणजे काय?
ओर्थोपोक्स या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे मंकीपॉक्स होऊ शकतो अशी माहिती समजली आहे. विशिष्ट खारी व उंदरांमध्ये हा विषाणू असतो. हे प्राणी या विषाणूचे नैर्सगिक स्रोत असल्याचे म्हटले आहे.
मंकीपॉक्स हा प्रामुख्याने माणसापासून माणसाला होणारी लागण जसे की, थेट शारीरिक संपर्क, शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यांमार्फत, जर खूप वेळ बाधित व्यक्तीचा संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे संसर्ग होऊ शकतो.
संशयित रुग्णाची लक्षणे
मागील ३ आठवड्यात मंकीपॉक्सबाधित देशांमध्ये प्रवास करून राज्यात आलेल्या व्यक्तीच्या शरीरावर अचानक पुरळ उठणे,सुजलेल्या लसिका ग्रंथी,ताप,डोकेदुखी,अंगदुखी,प्रचंड थकवा,घसा खवखवणे आणि खोकला अशी काही लक्षण आढळून आले आहेत.
मकीपॉक्स न होण्यासाठी घ्यायची काळजी
संशयित मंकीपॉक्स रुग्णास वेळीच विलग करणे. रुग्णांच्या कपड्यांशी अथवा अंथरूण पांघरूणाशी संपर्क येऊ न देणे. हातांची स्वच्छता ठेवणे.
आरोग्य संस्थांमध्ये मंकीपॉक्स रुग्णावर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे