Navi Mumbai News : वाशी – कल्याण ग्रामीण भागातील नवी मुंबईत समाविष्ट होणाऱ्या १४ गावांचा विकास खंटू नये म्हणून शासनाने १४० कोटींचा निधी तसेच येथील भंडाली गावातील कचराभूमी बंद करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र नवी मुंबई महापालिकेमध्ये गावे समाविष्ट करण्याबाबत अंतिम अधिसूचना अजून काढण्यात आली नसून कचराभूमीही बंद झाली नाही.
त्यामुळे १४० कोटींच्या निधीसाठी साटेलोटे केल्याचा अप्रचार काही घटकांकडून केला जात आहे, मात्र गणेशोत्सवानंतर १४ गावे नवी मुंबईत येतील तसेच कचराभूमीही बंद करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती २४ गाव विकास समितीने पत्रकार परिषदेत दिली.
कल्याणमधील १४ गावांना नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा २४ मार्च २०२२ मध्ये केली होती. त्यानंतर नगरविकास विभागाने मागील वर्षी हरकती सूचनांकरिता १२ सप्टेंबर २०२२ रोजी अधिसूचना जाहीर केली.
त्यावर एकही हरकत न आल्याने या १४ गावांचा नवी मुंबईत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र यावर आजतागायत अंतरिम अधिसूचना न काढल्याने या गावांचा समावेश नवी मुंबईत अजून करण्यात आला नाही. त्यामुळे या गावांचा विकास अजूनही खुंटलेला आहे.
ही अंतरिम अधिसूचना तात्काळ काढण्यात यावी तसेच भंडार्ली येथील ठाणे महापालिकेचे डम्पिंग बंद करावे म्हणून पावसाळी अधिवेशनात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी १४ गावांतील सर्वपक्षीय विकास समितीसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन मागणी केली. यावर अंतरीम अधिसूचना लवकरच काढण्यात येईल व १५ सप्टेंबरपर्यंत डम्पिंग बंद करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
अंतरिम अधिसूचना निघेपर्यंत या गावांच्या विकास खुंदू नये म्हणून येथील विकास कामांसाठी नगरविकास विभागातून ७० कोटी एमएमआरडीएच्या माध्यमातून ७० कोटी असे एकूण १४० कोटी निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते.
मात्र नवी मुंबईल १४ गावे समाविष्ट करण्याची अंतिम अधिसूचना अजून काढली नाही. तसेच इंपिंगही बंद झाले नसून १४० कोटीच्या विकास निधीवर या गावांची बोळवण केल्याचा अप्रचार सध्या काही घटकांकडून केला जात आहे.
हा प्रचार चुकीचा असून गणेशोत्सवानंतर १४ गावे नवी मुंबईत येतील व क्षेपणभूमी बंद करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी गणेशोत्सवापूर्वी झालेल्या भेटीत दिले, अशी माहिती १४ गाव विकास समितीने पत्रकार परिषदेत दिली.
कचराभूमी आणि १४ गावे नवी मुंबईत समाविष्ट करणे हे दोन्ही विभिन्न प्रश्न आहेत. कचराभूमी तर बंद होणारच आहे आणि १४ गावे समाविष्ट करण्याबाबत मंत्रालयात नगरविकास सचिवासोबत येत्या आठ दिवसांत बैठक लावून ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.-भरत भोईर, पंचायत समिती सदस्य
मुख्यमंत्र्यानी जाहीर केलेल्या १४० कोटी आणि कचराभूमीचा काहीही संबध नाही. येत्या १०-१२ दिवसांत कचराभूमी बंद होणार आहे. याबाबत ठाणे महापालिका आयुक्तासोबत चर्चा झाली आहे. तर येथील विकास कामासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यानी ३२ कोटी मंजूर केले असून त्यातील १५ कोटीची कामे निघाली आहेत. त्यामुळे डम्पिंग व विकास निधी याचा काही एक संबंध नाही,