अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरुन आता राज्यातील राजकारण तापलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन भेटीगाठीचा सिलसिलाही सुरु आहे.
आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनीही फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय.
‘शरद पवार यांनीच खऱ्या अर्थाने मागील 50 वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा घात केला. त्यांची एकमेव संघटना मान्यताप्राप्त आहे. मात्र, राज्य सरकार मान्यताप्राप्त संघटनेशीच चर्चा करतं. मात्र आजपर्यंत पवारांच्या संघटनेनं एसटी कर्मचाऱ्यांचे मूळ प्रश्न राज्य सरकारसमोर कधी मांडेलच नाहीत.
सरकार आणि मान्यताप्राप्त संघटनांनी मिळून कर्मचाऱ्यांचा घात केल्याचा घणाघात पडळकर यांनी केलाय. इतकंच नाही तर शरद पवार जर 2050 पर्यंत राहिले तर तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनातही ते 1980 आणि 2020 मधल्या भाषणातील मुद्देच सांगतील. जर एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले तर त्यांची संघटना उरणार नाही.
निवडणुकीवेळी एसटी कर्मचाऱ्यांचा वापर करता येणार नाही’, असा खोचक टोलाही पडळकर यांनी लगावला आहे. त्याचबरोबर विलिनीकरणाच्या मुद्द्यावर तोडगा निघाल्यावर आझाद मैदान सोडणार नाही, असंही पडळकर यांनी पुन्हा एकदा जाहीर केलं.