…तर आ.जगताप आणि आ.कांबळे यांना द्यावा लागणार आमदारकीचा राजीनामा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीसाठी नगर शहराचे आ. संग्राम जगताप व व श्रीरामपुरचे आ. भाऊसाहेब कांबळे हे दोन विद्यमान आमदार निवडणूक लढवीत आहेत.

लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाल्यास त्यांना निकालानंतर पंधरा दिवसात ‘खासदार’ किंवा ‘आमदार’ यापैकी एका पदाचा राजीनामा द्यावा लागेल. 

नगर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप उमेदवारी करीत आहेत.

तर, शिर्डी मतदारसंघात सेनेकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात काँग्रेसकडून श्रीरामपूरचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे उमेदवारी करीत आहेत. 

या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदारांचा विजय झाल्यास त्यांना पंधरा दिवसांच्या आत आपल्या दोन्हीपैकी एका पदाचा नियमानुसार राजीनामा द्यावा लागेल. 

‘लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. या निवडणुकीमध्ये एखादे विद्यमान आमदार विजयी झाल्यास त्यांना आपल्या आमदार किंवा खासदार या दोन्ही पदांपैकी एका पदाचा राजीनामा द्यावा लागेल. 

अशा प्रकरणात लोकसभा निवडणुकीला उभे असलेले बहुतांश विद्यमान आमदार हे विजयी झाल्यानंतर आमदारकीचा राजीनामा देणे पसंत करतात. 

राज्याच्या विधानसभेची मुदत ३१ ऑक्टोबरमध्ये संपणार असून लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर या निवडणुकीत विजयी झालेल्या विद्यमान आमदारांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतरही संबंधीत विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याची वेळ येणार नाही. 

कारण विधानसभेची मुदत संपण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी असल्यावरच रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत असते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24