प्रेमसंबंधातून तरुणाची धारदार शस्त्राने भाेसकून हत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जळगाव :- सुरत येथील तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तेथील तरुणांनी जळगावातील एका तरुणाचा चाकूने भोसकून खून केला. सोमवारी दुपारी ही घटना घडली, तर मंगळवारी पहाटे जखमी तरुणाचा मृत्यू झाला.

रितेश सोमनाथ शिंपी (१८, रा. खडके चाळ, शिवाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. रितेश हा कानुबाई उत्सवासाठी शनिवारी रात्री सुरत येथे मावशीकडे गेला होता. नवागाम डिंडोली येथे त्याची मावशी राहते.

दरम्यान, याच परिसरातील काही तरुण रितेशसोबत सतत वाद घालत असत. सुरत येथील एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याचा आरोप तेथील तरुण करत होते. रितेशने या तरुणीशी संबंध ठेवू नयेत, सुरतमध्ये येऊ नये, अशा धमक्या त्यांनी दिल्या होत्या.

मात्र, कानुबाई उत्सवानिमित्त रितेश शनिवारी रात्री सुरतला गेला होता, तर सोमवारी कानुबाईच्या विसर्जन मिरवणुकीत दुपारी नाचताना तरुणांनी रितेशला मारहाण केली. यातील एकाने थेट रितेशच्या पोटात चाकू खुपसला.

नंतर गंभीर अवस्थेत नागरिकांनी त्याला सुरत येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24