जायकवाडी दूरच, मुळामधून शेतकऱ्यांना रब्बीसाठी सुटणाऱ्या आवर्तनाबाबतच चिंता ! राजकीय पुढाऱ्यांची चुप्पी व शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : यंदा पाऊस अत्यल्प झाला. त्यामुळे जिल्ह्यात पाणी संकट उभे राहिले आहे. गेल्या वर्षी पाऊस होता , धरणे भरली होती त्यामुळे घाटमाथ्यावरील थोड्या पाण्याने का होईना पण मुळा, भंडारदरा धरणे भरली. मुळा मध्ये साधारण ९२ टक्के पाणीसाठा आहे.

परंतु असे असले तरी मुलाचे आवर्तन कधी सुटणार ? सुटणार की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच जायकवाडीला पाणी सोडल्यास मुळा उजवा व डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील ८१ हजार हेक्टर कृषी सिंचनाचा प्रश्न उभा राहील तो विषय वेगळाच.

* आवर्तनाबाबत संभ्रम, राजकीय पुढाऱ्यांची चुप्पी व शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

मुळा उजवा व डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने लाभार्थी शेतकऱ्यांची मदार धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. खरीप हंगाममध्ये पिके धोक्यात असताना मुळा पाटबंधारे विभागाकडून मुळा उजवा व डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात पाण्याचे एक आवर्तन सोडले व त्यामुळे शेतकऱ्यांची पिके व्यवस्थित घरात आली.

परंतु आता यापुढे मुळा उजवा व डावा कालव्यातून लाभक्षेत्रातील पिकांसाठी रब्बी हंगामातील पाण्याचे रोटेशन कधी सुटणार, याबाबत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे. याबाबत अजून काहीच निश्चितता नाही. तसेच राजकीय पुढारी देखील याबाबत काही बोलायला तयार नाहीत.

मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने मुळा उजव्या कालव्यातून चार, तर मुळा डावा कालव्यातून ५ आवर्तन सोडण्यात आले होते. पण यावर्षी मात्र पाणी परस्थिती चिंताजनक झाली असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. सध्या रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या शेती पाणी आवर्तनाची डिसेंबरपासून मागणी सुरु आहे.

* मुळामधील पाण्याचे ‘असे’ आहे सध्याला नियोजन

मुळा धरणाचा पाणीसाठा सध्या २३ हजार १५० दशलक्ष घनफूट आहे. यामध्ये ४ हजार ५०० दलघफू हा मृतसाठा म्हणून असतो. बाष्पीभवन ११८७ दलघफू, धरणावरील ९ पाणी योजनासाठी १९९० दलघफू पाणी असे नियोजन आहे. तसेच उर्वरित पाण्यात औद्योगिकीकरण साठी २५० दलघफू,

वांबोरी चारीसाठी ४०० दलघफू, कृषी विद्यापीठ संशोधनसही ३५० दलघफू, जायकवाडीसाठी २१०० दलघफू, मुळा डावा कालवा सिंचन व पिण्यासाठी १२१९ दलघफू, मुळा उजवा कालवा ७६१९ दलघफू असे या पाण्याचे सध्यातरी नियोजन करण्यात आलेले आहे.

* मुळा च्या दोन्ही कालव्यातून ‘अशा’ पद्धतीने आवर्तने सुटणार

रब्बी हंगामात मुळा उजव्या कालव्यातून ३० हजार हेक्टरसाठी पाणी आवर्तन सोडले जाईल. यामध्ये २० डिसेंबर २०२३ ते २ फेब्रुवारी २०२४ या ४५ दिवसांत ५ हजार दलघफू, तर उन्हाळी २५ मार्च ते १३ एप्रिल या २० दिवसांच्या आवर्तनात २ हजार ६१ दलघफू पाणी सिंचनासाठी दिले जाईल असे नियोजन सध्यातरी केले गेलेलं आहे.

मुळा डावा कालव्यामधून ४ हजार हेक्टरसाठी नियोजन केले गेले आहे. यात २० डिसेंबर ते १५ जानेवारी २०२४ या २७ दिवसांत ६०० दलघफू, तर उन्हाळी हंगामात १० फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या १९ दिवसांत ६५१ दशलक्ष घनफूट पाणी असे नियोजन असणार आहे.

* जायकवाडीची टांगती तलवार अद्यापही कायम

जायकवाडीला पाणी सोडण्याची टांगती तलवार अद्यापही कायम आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांनी नगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध दर्शवला आहे.

जनतेचाही विरोध आहे. परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीकडून पाण्याची मागणी होत असल्याने जायकवाडीची टांगती तलवार अद्यापही कायम असल्याचे बोलले जात आहे.