Kirit Somayya : राज्यात रोज एक पत्रकार परिषद घेत विरोधकांवर आरोपांच्या फैरी झाडणारे, त्यांचे घोटाळे काढणारे आणि गाडीभर पुरावेही देणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याच कार्यालयात श्रवण यंत्राचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे आता एकच चर्चा सुरु झाली आहे.
गैरव्यवहार प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या मुलुंड पूर्वमधील निर्मलनगर कार्यालयाचे प्रमुख प्रफुल्ल कदम यांनी नवघर पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. त्यावरून दोघांवर गुन्हे दाखल झाल्याचे समजते. याबाबत तपास सुरु आहे.
मुंबईतल्या मुलूंडमध्ये किरीट सोमय्या यांचं कार्यालय आहे. ‘ऐका स्वाभिमानाने’ या उपक्रमांतर्गत श्रवणयंत्र वाटप करण्यात येत होते. मात्र यातच दोघांनी गैरव्यवहार केल्याची माहिती आहे. जवळपास साडेसात लाख रुपयांच्या श्रवणयंत्रांचा परस्पर अपहार झाला असून कार्यालय प्रमुखांच्या ही बाब लक्षात आली.
त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. नवघर पोलिस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. यामुळे याची कल्पना किरीट सोमय्या यांना होती की नव्हती, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
याच कार्यालयातील प्रज्ञा जयंत गायकवाड आणि श्रीकांत रमेश गावित यांनी ७ लाख ३६ हजार रुपयांचा अपहार केल्याची प्राथमिक माहिती आहे. नवघर पोलिसांमध्ये दोघांविरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. किरीट सोमय्या यांच्याच कार्यालयात गैरव्यवहार झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.