कोपरगाव : तालुक्यातील ब्राम्हणगाव, टाकळी, येसगाव या परिसरात शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे
टाकळी फाटा येथील कांदा शेडमधील वजन मापे झालेला कांदा भिजला व मोठ्या प्रमाणात वाहून गेला.
यामुळे कोपरगाव बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांनी कांदा विक्री बंद ठेवली असल्यामुळे
मंगळवार ते शनिवार असे चार दिवस कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय कोपरगाव बाजार समितीने घेतला असल्याची माहिती सभापती संभाजी रक्ताटे यांनी दिली आहे.
कोपरगाव येथील कांदा व्यापाऱ्यांनी टाकळी परिसरात नव्याने मोठमोठाले कांद्याचे शेड उभे केले होते. त्यात खरेदी केलेला कांदा साठवून वजन मापे करून ठेवला होता.
मात्र, शनिवारी रात्री झालेल्या दमदार पावसाच्या तडाख्याने मोठ्या प्रमाणात कांदा भिजला व वाहून गेला.
यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी बंद ठेवली असून
कोपरगाव बाजार समितीने मंगळवार दि. २५ ते शनिवार दि. २९ पर्यंत चार दिवस कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला
असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले, संचालक मंडळ व प्रशासनाने घेतला असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीसाठी आणू नये, अशी विनंती करण्यात आली आहे.
पावसाचे वातावरण व कांदा साठवण या अडचणीमुळे बाजार समितीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला असून सामान्य जनतेला देखील कांद्याच्या वांध्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.