नाशिक विलास पवार: मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी संपादित करावयाच्या जमिनींसाठी नांदगाव आणि मालेगाव तालुक्यातील २१ गावांत सर्वेक्षण सुरू करण्याचे निर्देश रेल्वे विभागाने दिले आहेत.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा हा रेल्वेमार्ग नाशिक आणि धुळे जिल्ह्यातून जाणार असून, पहिल्या टप्प्यात बोरविहीर-नरडाणादरम्यान जमिनींचे भूसंपादन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
आता दुसऱ्या टप्प्यात नांदगाव आणि मालेगाव तालुक्यातील गावांमध्ये भूसंपादनासाठी सर्वेक्षण प्रक्रिया सुरू होत आहे. नाशिक जिल्ह्यात मनमाड ते झोडगेपर्यंत या रेल्वेमार्गाचे अंतर ५५ किलोमीटरचे राहणार आहे.
दोन राज्यांतील दळणवळणाला चालना देणाऱ्या मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाची मागणी अनेक वर्षांपासून होती. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने यासाठी मंजुरी दिल्यानंतर रेल्वेमार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला आहे.
पहिल्या टप्प्यात धुळे जिल्ह्यातील बोरविहीर – नरडाणापर्यंत जमिनींचे संपादन झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. धुळे पारोळा महामार्गावर फागणे गावानजिक या रेल्वे मार्गावरील पहिले रेल्वेस्थानक उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील नांदगाव आणि मालेगाव या दोन्ही तालुक्यांमध्ये भूसंपादन प्रक्रियेसाठी सर्वेक्षणाचे निर्देश देण्यात आले आहेत.
नांदगाव, मालेगाव तालुक्यातील गावांचा समावेश
नांदगाव तालुक्यातील मनमाड, अस्तगाव, पांझणदेव, खादगाव, नवसारी आणि भार्डी या सहा गावांत, तर मालेगाव तालुक्यातील चोंडी, जळगाव, काळेवाडी, घोडेगाव, घोडेगाव चौकी, वहऱ्हाणे, मेहू, ज्वार्डी बुद्रुक, ज्वार्डी खुर्द, येसगाव बुद्रुक, सवंदगाव, सायने बुद्रुक, मल्हानगाव, चिखलहोळ आणि झोडगे या १६ गावांत भूसंपादनासाठी सर्व्हेक्षण सुरू होत आहे. यासाठी केंद्र शासनाने सक्षम अधिकारी म्हणून भूमी अधिग्रहण विभागाचे उपजिल्हाधिकारी (नाशिक) यांची नियुक्ती केली आहे.
जिल्ह्यात सात रेल्वेस्थानके
मनमाड-इंदूर रेल्वेमार्गावर नाशिक जिल्ह्यात सात ठिकाणी रेल्वेस्थानक उभारण्यात येणार आहे. यात मनमाड, खादगाव, चोंडी, येसगाव बुद्रुक, मालेगाव, चिखलहोळ आणि झोडगे या गावांचा समावेश आहे.