दररोज वेगवेगळ्या बातम्या समोर येत असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्याने आता कोणाचं सरकार येणार यावरुन विविध चर्चा होत आहेत.
अशाच प्रकारे सुरु असलेल्या चर्चेत एक विचित्र घटना घडली आणि एका मित्राने दुसऱ्या मित्राचा चक्क कानच तोडल्याचा प्रकार समोर आला आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात असलेल्या इनामवाडी येथे रत्नाजी नाईकवाडे, शैलेश नाईकवाडे आणि संदीप शिंदे हे तीन मित्र गप्पा मारत होते.
या मित्रांमध्ये सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा सुरु होती. मात्र, ही चर्चा टोकाला पोहोचली आणि मग त्यातून वाद निर्माण झाला.
भारतीय जनता पक्षाच्या विरोधात का बोलतोस असं म्हणत रत्नाजी नाईकवाडे या तरुणाने संदीप शिंदे याचा कान चावला. या घटनेत संदीप शिंदे याचा कान तुटल्याचं समोर आलं आहे.
रत्नाजी नाईकवाडे आणि संदीप शिंदे यांच्यात झालेल्या या वादाचं रुपांतर हाणामारीतही झालं. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत वाद सोडवला.
या प्रकरणी संदीप शिंदे याच्या भावाने लातूर जिल्ह्यातील निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.