अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसने दुपटीहून अधिक जागा पटकावत जिल्ह्यावरील वर्चस्व सिद्ध केले. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार यांनी यंदाच्या नगर जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते.
मागील निवडणुकीवेळी भाजपमध्ये गेलेल्या श्रीगोंद्याच्या बबनराव पाचपुतेंना पराभूत करून पवारांनी जसा करिष्मा दाखवला होता, तसाच या वेळी अकोल्यात पिचडांना पराभूत करून दाखवला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पवारांना मानणारा मोठा वर्ग असल्याचे सिद्ध होते.
राष्ट्रवादी पक्षाला आलेली उभारी कायम ठेवून पुन्हा संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न आता सुरू होतील. पूर्वी पक्षात आपसांत कुरबुरी होत होत्या. बहुतांश नेते केवळ पक्षाध्यक्ष शरद पवार आल्यानंतरच एकत्र येत असत.
त्या काळात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समर्थक सुप्त गटही अस्तित्वात होता. आता मात्र रोहित यांचा संपर्क वाढणार आहे. त्यांचे नेतृत्व जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांनाही मान्य करावे लागणार आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादीचे जे आमदार निवडून आले, त्यातील चौघे युवा आहेत. उरलेलेही तसेच तरुणच आहेत. एकाच वयोगटातील असल्याने रोहित यांच्यासोबत त्यांचे सूर अधिक चांगल्या पद्धतीने जुळून संघटना बांधणीसाठीही त्याचा फायदा होईल, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते मानतात.