अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- आजोबा डाॅ. दादासाहेब यांची दहा वर्षे, तर वडील प्रसाद यांची पंचवीस वर्षे अशी सुमारे ३५ वर्षे आमदारकी तनपुरे यांच्या वाड्यात राहिली. मध्यंतरी चंद्रशेखर कदम व शिवाजी कर्डिले यांच्यामुळे १६ वर्षे आमदारकी तनपुरे घराण्यापासून दूर गेली होती. नोव्हेंबरमध्ये प्राजक्त तनपुरे आमदार झाले आणि पहिल्याच धडाक्यात ते मंत्री झाल्याने राहुरीत दिवाळी साजरी झाली.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राहुरीला प्रथमच मंत्रिपद मिळाले. १९५६ मध्ये तालुक्यातील गुहा येथील लक्ष्मण माधवराव पाटील हे दारूबंदी मंत्री झाले होते. तनपुरे यांचा मंत्रिमंडळात सोमवारी दुपारी शपथविधी होताच शहरात व तालुक्यात दिवाळी साजरी करण्यात आली. मंत्रिमंडळात तनपुरे यांचा समावेश होणार, असा निरोप मिळताच रात्रीच मोठ्या संख्येने विविध क्षेत्रांतील मान्यवर मुंबईला रवाना झाले.
तनपुरे यांनी शपथ घेताच राहुरीत जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. माजी खासदार प्रसाद तनपुरे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी राहुरीत कार्यकर्त्यांसमवेत शपथविधी सोहळा अनुभवला. शिवाजी चौक, शनी चौक, बाजार समिती, तनपुरेवाडा, स्टेशन रोड, तनपुरेगल्ली, नवीपेठ, बाजारपेठ, तसेच सराफ बाजारात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
प्राजक्त हे राष्ट्रवादीचे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहेत. त्यांच्या रूपाने राहुरी तालुक्याला पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळाली. माजी खासदार तनपुरे हे सात वेळा आमदार व एकदा खासदार झाले होते. पवार यांचे ते कट्टर समर्थक आहेत. मात्र, त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नव्हती. तनपुरे कारखान्याचे संस्थापक बाबुराव दादा तनपुरे यांचे प्राजक्त नातू आहेत.
दादासाहेबांमुळे मुळा धरणाची निर्मिती झाली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ झाले. मुळा-प्रवरा वीज संस्था, जिल्हा बँक यासह अनेक संस्थांच्या उभारणीत त्यांचा वाटा होता. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध होते, पण त्यांना मंत्रिपदी संधी मिळाली नव्हती.
शरद पवार यांनी आता राजकीय अन्याय दूर केला आहे. अमेरिकेत उच्च शिक्षण प्राजक्त तनपुरे यांचा जन्म १३ सप्टेंबर १९७६ रोजी झाला. एम. एस. पदवी घेतलेेले ते अभियंता असून त्यांनी उच्च शिक्षण अमेरिकेत घेतले आहे. तीन वर्षांपूर्वी राहुरीचे ते नगराध्यक्ष झाले. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा पराभव केला.