पुणे – भरगर्दीमध्ये चालक महिलेचे नियंत्रण सुटल्यामुळे खेळण्यांच्या दुकानात घुसलेल्या कारची धडक बसून झालेल्या अपघातात एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला.
ही घटना शनिवारी सायंकाळी नारायण पेठेतील लोखंडे तालीम येथे घडली. दीपा गणेश काकडे (वय ५३, रा. नारायण पेठ) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एका कारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी रस्ता व केळकर रस्त्याच्या अंतर्गत भागातील लोखंडे तालीमजवळ शनिवारी सायंकाळी एका महिलेचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार भरगर्दीत अंबिका टॉइज नावाच्या दुकानात घुसली.
त्या वेळी काकडे या त्यांच्या पतीसमवेत पायी जात होत्या. कारने त्यांनाही उडवले. त्यानंतर काकडे यांना रिक्षातून एका खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे ‘आयसीयू’मध्ये जागा नसल्याने डेक्कन येथील रुग्णालयात हलवण्यात आले. काकडे यांना अंतर्गत दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.