तरुणावर बिबट्याचा हल्ला; या ठिकाणी घडली घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. प्राण्यांना भक्ष करणाऱ्या बिबट्याने मानवी वस्तीकडे आपली वाटचाल केली आहे.

यातच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच पुन्हा एकदा बिबट्याने संगमनेर तालुक्यात एका तरुणावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीदुमाला येथील अनिल संभाजी मधे या तरुणावर बिबट्याने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले आहे.

सदर घटना गुरुवारी (ता.12) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, आंबीदुमाला येथे एका शेतात अनिल हा तरुण ही शेती करत होता.

गुरुवारी सकाळी शेतातील कांद्याच्या रोपाला पाणी भरण्यासाठी हा तरुण गेला असता पाणी भरत असतानाच बांदाच्या खाली असलेल्या गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तरुणाच्या पायावर हल्ला केला.

त्यामुळे त्याने मोठमोठ्याने आरडाओरड केल्याने वडील संभाजी मधे हे धावत मुलाच्या दिशेने गेले. तोपर्यंत बिबट्याने धूम ठोकली होती. जखमी अनिलला औषधोपचार करण्यासाठी बोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते.

त्यानंतर वन विभागाच्या कर्मचार्‍यांनीही घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने या परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

शेळीवरही हल्ला केला होता, पाळीव प्राण्यांवर सतत हल्ले होत असतानाच नागरिकांवरही हल्ला केल्याने वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24