Maharashtra News : गर्दीच्या वेळी लोकलमधून प्रवास करणे आता खूपच धोक्याचे झाले आहे. गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अवधेश दुबे, रिया राजगोर पाठोपाठ शनिवारी राहुल पुरुषोत्तम अष्टेकर (४८) यांचादेखील गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला.
आठवडाभरात तीन डोंबिवलीकर तरुणांना रेल्वे प्रवासादरम्यान आपला जीव गमवावा लागल्याने चाकरमानी रेल्वे प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी येथे राहणारा अवधेश दुबे (२५) याचा २३ एप्रिल रोजी सकाळी गर्दीच्या वेळी दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वेतून खाली पडून मृत्यू झाला. २९ एप्रिल रोजी सकाळी डोंबिवली पूर्वेकडील रिया राजगोरे या तरुणीचा कोपर ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमधून खाली पडून मृत्यू झाला.
डोंबिवली पश्चिमेकडील श्रीधर म्हात्रे वाडी श्रीकृष्ण भवन बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या राहुल पुरुषोत्तम अष्टेकर (४८) यांचा शनिवार, २७ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची नोंद ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
आठवडाभरात तीन डोंबिवलीकर तरुणांचा गर्दीमुळे धावत्या लोकलमधून खाली पडून मृत्यू झाल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये रेल्वे तीव्र असंतोष निर्माण झाला असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.