अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने खूपच हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता दोन हजाराच्या पुढे गेली आहे. त्यामुळे ही परिस्थिती वेळेत रोखण्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे आहे.
परंतु केवळ पालकमंत्र्यांच्या अट्टाहासामुळे जिल्ह्यात लॉकडाउन होत नसल्याची माहिती मिळत आहे’, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता केला.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधत टीका केली.
यावेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजी कर्डिले, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आदी उपस्थित होते. सध्या करोनाचा प्रादुर्भाव नगर जिल्ह्यात वाढत आहे.
त्यामुळे पालकमंत्र्यांनी सदैव सतर्क राहून जिल्ह्यातील जनतेला दिलासा देण्याचे काम करणे गरजेचे आहे. येथे पालकमंत्र्यांनी २४ तास उपलब्ध राहिले पाहिजे.
जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. या पार्श्वभूमीवर ज्या अडचणी येतील, त्या सोडविण्यासाठी प्रशासनाला लोकशाही मार्गाने योग्य निर्देश देणे गरजेचे आहे . परंतु येथे त्याचा अभाव दिसत आहे,’ असेही ते म्हणाले.
दरम्यान, खा.डॉ.सुजय विखे यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेत ‘नगर शहरासह जिल्ह्यात सुरुवातीला दहा रुग्ण होते. ते आता हजाराच्यावर गेले आहेत.
कोरोनाचा इतक्या झपाट्याने प्रसार होत आहे की परिस्थिती वेळीच नियंत्रणात न आल्यास मोठे तांडव निर्माण होऊ शकते. त्यामुळे एक डॉक्टर म्हणून माझे असे मत आहे की, जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन पाच ते दहा दिवसांचा लॉकडाऊन करावा.’ अशी मागणी केली होती.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com