अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यातच बेड, इंजेक्शन सह ऑक्सिजनचा देखील तुटवडा जाणवतो आहे.
तसेच या गोष्टींचा काळाबाजार करून रुग्णांची लूट सुरु असल्याची घटना नगर जिल्ह्यात सुरु आहे. यामुळे करोनाच्या संकटाकडे संधी म्हणून नव्हे, तर सेवा म्हणून पहा, असे आवाहन मनपा आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांनी खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना केले.
नुकतेच महापालिकेत शहरातील खासगी डॉक्टर व त्यांच्या प्रतिनिधीची बैठक पार पडली. सध्या जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. याच परिस्थितीचा काहीजण फायदा घेताना दिसत आहे.
अतिगंभीर रुग्णांसाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन घेताना खाजगी प्लँटवाल्यांकडून जादा पैसे घेतले जातात, अशी तक्रार खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी महापालिकेच्या आरोग्य समितीकडे केली. या बैठकीत डॉक्टरांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या.
त्यावर जिल्हाधिकार्यांशी चर्चा करून यावर मार्ग काढू असे, आश्वासन या डॉक्टरांना देण्यात आले. तसेच पैशाअभावी कोणाची अडवणूक करू नका असे आवाहन खासगी रुग्णालयांना करण्यात आले.
रूग्णालयांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी होत असल्याचा विषयही बैठकीत निघाला. मात्र, शासनाचे दर आणि त्याशिवाय होणारे उपचार याचा विचार करूनच रुग्णालये बिल आकारणी करते, अशी माहिती खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून देण्यात आली.
रेमडेसिवीर इंजेक्शनची अजूनही गरज आहे. ते पुरेसे मिळावेत, अशी मागणी डॉक्टरांनी केली. महापालिकेने हॉस्पिटलला लावलेले कर कमी केले तर रुग्णांना बिलात आणखी सवलत देता येणे शक्य असल्याचा मुद्दाही बैठकीत चर्चेला आला.