अहमदनगर लाईव्ह 24 टीम / वाशीम :- भाड्याने राहत असलेल्या घरात प्रेमीयुगुलाने गुरुवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.
राधा भगवान आढाव (२४) व सूरज विठ्ठल पवार (२४) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेतील मृत विवाहित महिला राधा आढाव हिला तिच्या पतीकडून पाच वर्षीय मुलगी व तीन वर्षीय मुलगा अशी दोन अपत्ये आहेत.
मात्र, तिचे गावातीलच सूरज पवार या तरुणासोबत काही महिन्यांपूर्वी प्रेमसंबंध जुळले. राधा आणि सूरज २७ नोव्हेंबर रोजी घर सोडून निघून गेले होते.
त्यानंतर महिलेचा मामा व सासऱ्याने या प्रकरणी शिरपूर पोलिसात फिर्याद दिली होती. दरम्यान, काही दिवसांनी राधा घरी परत आली. त्यानंतर ती पती आणि मुलांसोबत राहू लागली.
काही दिवसांनंतर ती पुन्हा घरून निघून गेली आणि १८ डिसेंबर रोजी गावात परतली. घरी आल्यानंतर तिने प्रथम आपली दोन्ही मुले गावातच राहणाऱ्या सासू, सासऱ्यांकडे साेडून दिली.
पती रात्रीच्या सुमारास शेतात रखवालीसाठी गेलेला होता. गुरुवारी सकाळी राधा आणि सूरज पवार यांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. राधाच्या सासरच्यांनी ही माहिती शिरपूर पोलिसांना कळवली.