राज्यात मान्सून दाखल असला, तरी त्याने प्रगती केली नाही. त्यामुळे त्याचा त्याच जागेवर मुक्काम आहे. परंतु मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत दाखल होण्याची शक्यता आहे.
पुढील चार दिवस राज्यातील काही भागांत हवामान विभागाने पावसाचा यलो व ऑरेंज अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग, सांगली व कोल्हापूर या संपूर्ण जिल्ह्यात, तर रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागांत मान्सून थांबला आहे.
मान्सूनची सीमा शुक्रवारी रत्नागिरी,
सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयानगरम भागांत होती. मान्सून संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, तसेच तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह राज्याच्या इतर भागांत पाऊस पडला आहे. येत्या ८ ते ११ जूनदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पाऊस व ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात बदल झाला असून, सर्वात जास्त ४३.२ अंशतापमान ब्रह्मपुरी येथे नोंदवले गेले.