अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत काय झाले याची उत्सुकता ही जेवढ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आहे तेवढ्याच प्रमाणात व्यापारी आणि प्रक्रिया उद्योजकांना आहे.
कारण व्यापारी आणि उद्योजकांचे सोयाबीन दरवाढीबाबतचे सर्व अंदाज हे फोल ठरत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर हे स्थिर आहेत.
तर दुसरीकडे मुहूर्ताच्या दरावरुन जी अकोला बाजार समिती चर्चेमध्ये आली होती त्याच बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्रमी दराच्या दिशेने आगेकूच करीत आहे.
कारण बुधवारी या बाजार समितीमध्ये चक्क 8300 चा दर एका शेतकऱ्याच्या सोयाबीनला मिळालेला आहे. हंगामाच्या सुरवातीलाही अकोला बाजार समिती चर्चेत होती ती वाढीव दरामुळे.
या बाजारसमितीने तब्बल 11 हजार 300 रुपये हा मुहूर्ताच्या सोयाबीनला दर जाहीर केला होता. मात्र, त्यानंतर दरात कमालीची घट झाली होती.
बुधवारी याच बाजार समितीमध्ये गणेश सांकूदकर या बाभूळगाव येथील शेतकऱ्याच्या सोयाबीनला 8 हजार 300 रुपये प्रति क्विंटला दर मिळालेला आहे.
या शेतकऱ्याने 12 पोते सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. सोयाबीन हे चांगल्या प्रतिचे असल्याने हा दर मिळाला आहे. सरासरी दर हा 6 हजार 400 रुपयेच चालू आहे. मात्र, अशीच आवक होत राहिली तर दरात वाढ निश्चित मानली जात आहे.