महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होण्याच्या मार्गावर ; अनेकांचे रोजगार हिरावले जाणार, बंद न करण्याची मागणी

Mahesh Waghmare
Published:

२५ जानेवारी २०२५ सुपा : महाराष्ट्र राज्य लॉटरी यश आज नाही तर उद्या अशा जाहिरातीद्वारे घराघरात पोहचलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी आता बंद करण्यात येणार आहे. लॉटरी चालवणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य राहिलेले नाही असे कारण देत हा निर्णय घेण्यासाठीच्या हालचाली सुरु आहेत.अचानक धनलाभ व्हावा यासाठी गेली साडेपाच दशके करोडो लोकांनी या लॉटरीची तिकिटे काढली.

काहींचे नशीब फळफळले तर अनेक जणाच्या पदरी निराशा आली.अनेकांच्या भाग्याची परीक्षा पाहणाऱ्या लॉटरीला आता गाशा गुंडाळावा लागणार आहे. मटका, जुगाराचे व्यसन वाढलेले असताना त्याला पायबंद घालावा या हेतूने एप्रिल १९६९ पासून महाराष्ट्र राज्य लॉटरीची सुरुवात करण्यात आली होती.

विक्रेत्यांना कमिशन दिल्यानंतर उर्वरित रकमेवर २८ टक्के जीएसटी राज्य सरकारला भरावा लागतो.मोठा अस्थापना खर्चही येतो.हे आर्थिकदृष्टया परवडणारे नसल्याने लॉटरी बंद करावी असा प्रस्ताव आहे.दुसरीकडे लॉटरी विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, लॉटरीची तिकिटे इतर राज्यांमध्ये विकण्यास अनुमती दिली तर आर्थिक दृष्टया व्यवहार्य होऊ शकते.राज्य लॉटरी बंद करण्यास विक्रेत्यांचा विरोध असून त्यामुळे लॉटरी विक्रेत्यांवर गदा येणार आहे.

महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होण्याच्या मार्गावर असल्याने त्यामुळे अनेकांचे रोजगार हिरावले जाणार आहेत.लाखो लोकांना बेरोजगार होण्यापासून वाचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेने हा शासनाच्या विचाराधीन असलेला बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe