Maharashtra News : सत्ता येते व जाते; पण माणसाचे प्रेम महत्वाचे आहे. सत्ता बदल झाल्यावर मंत्रीपदाची संधी असतानाही माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी साथ सोडली नाही.
सध्या राज्यात शेतकरी बांधवांच्या विविध समस्या असताना सत्ताधारी इतर पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत.
त्यामुळे येत्या काळात जनता दलबदलुंना जागा दाखवून देणार असल्याचे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
नेवासा तालुक्यातील सोनई येथील जगदंबा देवी मंदिर प्रांगणात आमदार गडाखांच्या पुढाकारातून काल मंगळवारी (दि.१३) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ते, शिवसैनिकांचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते.
ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेला महाराष्ट्र कुठल्याही हुकूमशाहीला बळी पडणार नाही. शेतकरी बांधव देशोधडीला लावण्याचे काम सरकार करत आहे. हक्कासाठी शेतकरी दिल्लीला जाऊन धडकला तरी सरकारला त्यांच्याकडे पाहण्यास वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली.
आमदार गडाख म्हणाले, मुख्यमंत्री पदाच्या काळात कुठलीही निवडणूक नसतानादेखील शेतकरी बांधवांसाठी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही राज्यातील शेतकरी बांधव कधीही विसरू शकत नाही.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, सर्वाधिक गर्दा असलेली उद्धव ठाकरे यांची सभा सोनईत होत आहे. ही बाब विशेष कौतुकाची आहे. ज्यांना अनेक पदे दिली, असे लोक सोडून गेले, तरी जनता ठाकरे बरोबरच राहणार आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांना आ. गडाख यांनी साथ दिलेली आहे, हे योगदान आम्हीही कधीही विसरणार नाही, असे ते म्हणाले. आ. गडाख व सुनील गडाख यांनी स्वागत केले.
याप्रसंगी युवा सेनेचे वरुण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर, युवा नेते उदयन गडाख, डॉ. निवेदिता गडाख, शुभांगी पाटील, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे,
रावसाहेब खेवरे, प्रा. शशिकांत गाडे, भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, विक्रम राठोड, राजेंद्र दळवी, संदेश कार्ले, मच्छिद्र म्हस्के, हरीभाऊ शेळके, पंकज लांभाते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.