अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- आज महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहानं देशभर साजरा होणार आहे. यातच नगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पुणतांबा येथे महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरत आहे.
दरम्यान अनेक कालावधीनंतर मंदिरे पुन्हा एकदा खुली करण्यात आली आहे. करोनाच्या प्रादूर्भावामुळे मागील दोन वर्षांपासून महाशिवरात्री यात्रा रद्द करण्यात आली होती.
आता मात्र संसर्ग कमी झाल्यामुळे नियमांचे पालन करून भाविकांना योगीराज चांगदेव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्याची मुभा मिळणार आहे.
तसेच संपूर्ण मंदिराला आकर्षण विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविकांना जास्तीत जास्त सुविधा उपलबध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
दरम्यान यात्रेनिमित् पुणतांबा ग्रामपंचायत प्रशासनाने सुद्धा जय्यत तयारी केली असून पंचायतीमार्फत परिसरात स्वच्छता केली आहे. तसेच भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे, वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पुरेशी काळजी घेण्यात आली आहे.