दलितांवरील अत्याचार रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी असल्याचा आरोप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :  महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात दलित आणि बौध्दांवर वाढत्या अत्याचाराचा तसेच मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थान असलेले राजगृहावर झालेल्या हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.

मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरपीआयचे राज्य सचिव अजय साळवे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, शहराध्यक्ष अमित काळे, संजय कांबळे, अविनाश भोसले, विनोद भिंगारदिवे, दिपक गायकवाड, दया गजभिये, सनी खरारे, प्रविण वाघमारे, आरती बडेकर, विवेक भिंगारदिवे सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी निळे व काळे झेंडे हातात घेऊन जय भिमच्या घोषणा देत राज्य सरकारचा निषेध नोंदवला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात दलित आणि बौध्दांवर होणार्‍या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना महामारीचा फैलाव सुरू असतानाही दलितांची घरे जाळली जात आहे. मागासवर्गीय दलित युवकांची हत्या होत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात असे घृणास्पद प्रकार घडत आहे.

मागासवर्गीय दलितांवर होणार्‍या अत्याचार रोखण्याबाबत महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरली आहे. या प्रकरणाकडे राज्य सरकार अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे. मुंबई दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास स्थान असलेले राजगृह आहे. हे राजगृह समस्त आंबेडकरी जनतेसाठी पवित्र अशी वास्तू असून, जगभरातील आंबेडकरी अनुयायांचे हे प्रेरणास्थान व ऊर्जा स्थान आहे.

या वास्तूवर  झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. घाटकोपर येथे 11 जुलै 1997 रोजी आंबेडकरी अनुयायांवर गोळीबार झाला. यामध्ये 11 अनुयायींनी प्राणाची आहुती दिली. या स्मृतिदिनी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आहवानाला प्रतिसाद देत संपुर्ण महाराष्ट्रात फिजीकल डिस्टन्स व इतर नियमांचे पालन करुन शनिवार दि.11 जुलै रोजी आरपीआयच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात दलित आणि बौध्दांवर होणारे अत्याचार आणि गुन्ह्याच्या तपासासाठी महाराष्ट्र मधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांची नेमणूक करण्यात यावी, दलित आणि बौध्दांवर होणारे अत्याचार आणि गुन्ह्याचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींवर कठोर कारवाई व्हावी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थान राजगृहावर झालेल्या हल्ल्याची सीआयडीमार्फत सखोल चौकशी व्हावी, तसेच या वास्तूला 24 तास पोलिस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांना देण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24