१४ जानेवारी २०२५ मुंबई : विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांत समन्वय व संवादाचा अभाव दिसून आला आहे.विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकही संयुक्त बैठक झालेली नाही.
२०१९ मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती संवाद न झाल्यानेच तुटली होती,याची आठवण शिवसेनेने करून दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा केली.
सोमवारी राऊत यांनी पवारांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ४० ते ४५ मिनिटे भेट घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने स्वबळाची भाषा केल्यानंतर पवारांनीच राऊतांना बोलावून चर्चा केल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.विधानसभा निवडणुकीत महायुतीने जबर पराभवाची धूळ चाळल्यानंतरही या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन या पराभवाचे चिंतन तथा मंथन केलेले नाही.
त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचे भवितव्य काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यातच शिवसेनेने (ठाकरे) मुंबई महापालिकेसह सर्व महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीतील इतर दोन्ही पक्षांत खळबळ उडाली.
शिवसेनेने (ठाकरे) जनतेने दिलेला कौल स्वीकारत पक्षाच्या नेते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून पक्षातील लोकांशी सातत्याने संवाद साधत आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षानेही मागील आठवड्यात मुंबईत पक्षाची दोन दिवसीय चिंतन बैठक प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतली.यावेळी आगामी काळातील दिशा स्पष्ट केली.