संगमनेर :- पाच वर्षे सरकारशी थोडेफार संघर्ष झाले असले, तरी आम्ही भाजपशी रोखठोक आणि जाहीरपणे युती केली आहे.
ही युती देव, देश आणि धर्मासाठी केली. ती केवळ खुर्चीसाठी केलेली नाही. आम्हाला नेहमी पाकिस्तानची भीती दाखवली जाते.
मात्र, आमच्याकडील अण्वस्त्रे ही दिवाळीसाठी नाहीत, असे पाकिस्तानला ठणकावून सांगणारा पंतप्रधान आम्हाला मिळाला. महायुतीला बहुमत मिळेल व पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच आरुढ होतील, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी सोमवारी रात्री ठाकरे यांची संगमनेरच्या जाणता राजा मैदानावर सभा झाली.
सभेसाठी भगवा जनसागर लोटला होता. या वेळी ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, विधानसभेचे उपसभापती विजय औटी, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, संपर्कप्रमुख आमदार हेमंत दराडे, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, सचिन तांबे, जालिंदर वाकचौरे आदी उपस्थित होते.