अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीचे सुपुत्र आयपीएस महेश भागवत यांना तेलंगणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी मिळाली आहे.
एका मराठी अधिकाऱ्याची ही झेप अहमदनगरसाठी अभिमानाची बाब आहे.महेश भागवत हे सध्या रचकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. आता, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचाकपदी विराजमान होत आहेत.
महेश मुरलीधर भागवत (१७ जून, १९६९) हे मूळचे पाथर्डी तालुक्यातील आहेत. पाथर्डीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांचं प्राथमिक आणि आणि तिलोक जैन विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथून त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केले.
आपल्या इंजिनिअरिंगच्या पदवीनंतर 1993-94 मध्ये महेश भागवत हे पुण्यातील टाटा मोटार्स या कंपनीत कामाला होते. पार्थर्डीसारख्या ग्रामीण भागातून पुढे येत परिस्थितीशी दोनहात करत भागवत यांनी आयपीएस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षांची तयारी केली.
आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर भागवत यांनी आयपीएस परीक्षा पास केली. गेल्या अनेक वर्षांपासून ते आंध्र प्रदेशमध्ये कार्यरत आहेत. विशेष म्हणजे तेलंगणा राज्य निर्मित्ती झाल्यानंतर त्यांना तेलंगणाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे, सध्या ते तेलंगणातील रचकोंडा येथे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत
आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यात काम करीत असताना पीपल्स वॉर ग्रूपच्या नक्षलवाद्यांनी सिरपूर-कागजनगरचे आमदार आणि त्यांच्या चार अंगरक्षकांची हत्या केली. नक्षल्यवाद्यांना स्थानिकांचा पाठिंबा मिळत असल्याचे पाहिल्यावर भागवत यांनी पाठिंब्यामागची कारणे शोधून काढली आणि नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणणारा अज्ञातम् स्वेच्छा हा प्रकल्प राबविला. पोलीस आणि नागरिकांमधील समन्वयासाठी मैत्री संघम्’ निर्माण केला. मी कोसम् या उपक्रमाद्वारे त्यांनी कम्युनिटी पोलिसिंगचे उदाहरण दिले.
आंध्र प्रदेशातील नलगोंडाचे पोलीस अधीक्षक असताना यादगिरीगुट्टा येथील मानवी व्यापाराचे मोठे रॅकेट त्यांनी उघडकीस आणले. त्यात अडीचशे व्यक्तींना अटक करुन लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या स्त्रियांची सुटका केली. त्यानंतर पीडित स्त्रियांना उदबत्त्या, भांडी निर्मितीचे, शिवणकामाचे शिक्षण देऊन उपजीविकेचे साधन दिले. या महिलांच्या मुलींच्या नशिबी वेश्याव्यवसायातले जीवन येऊ नये म्हणून सात ते पंधरा वयोगटातील मुलींना त्यांनी शाळेत पाठविण्याची व्यवस्था केली. त्यांनी अशासकीय संस्थांची मदत घेत शेकडो मुले, महिला, युवतींची सुटका केली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत आणि नर्मदा बचाओ आंदोलनात मेधा पाटकर यांच्यासोबत भागवतांनी काही काळ काम केले आहे.कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी आपल्यातील संवेदनशील अधिकाऱ्याचे दर्शन घडवले आहे. तेलंगणात 40 हजार पेक्षा जास्त गरीब अन् गरजू लोकांना जेवण पुरविण्याच काम त्यांच्यामार्फत त्यांच्या पथकाने केल आहे. तर, स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या मूळगावी पोहोचविण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेऊन मोहिम राबवली.
एका तालुक्यातून पुढे येऊन राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदापर्यंतचा भागवत यांचा प्रवास देशातील विशेषत: महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणांसाठी प्ररेणादायी आहे.जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश या उक्तीप्रमाणे महेश भागवत यांची पोलीस सेवा सूरु आहे. यांच्यासारख्या लोकांमुळे समाज भक्कमपणे उभा आहे आणि परिवर्तनाची आशा जिवंत ठेवतो आहे. आयडॉल म्हणून भागवत सरांचं नाव आदराने घेतलं जातं.
……………………………………………………………………………………………………………………………………………………………………..
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
………………………………………………………………………………………………………………………………………………………………………