अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वाई तालुक्यातील मांढरदेव गडावरील काळूबाई देवीची यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली आहे.
मात्र, भाविक भक्त गडावर येऊन दुरवरूनच दर्शन घेऊन भोर तालुक्यातील आंबाडखिंड घाटाच्या सुरुवातीच्या माळरानावर बकरी, कोंबडे कापून जत्रा साजरी करीत असल्याने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पशुहत्या होत आहे.
याकडे भोर तालुका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने आंबाडे गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे यात्रा रद्द झाली असली तरी पशुहत्या मात्र सुरूच असल्याचे चित्र आहे.
कोरोनामुळे गर्दी होऊन प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता शासनाने यात्रा बंदच निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यासह परराज्यातील बहुतांशी भाविकांनी यात्रेला येणे टाळले असले
तरी काही भाविक मांढरदेव गडाच्या आसपास (आंबाडखिंड घाटाच्या पायथ्याशी) माळरानावर येऊन देवदेवतांच्या कार्यक्रमासाठी पशुहत्या करीत आहेत.
त्याच ठिकाणच्या आंबाडेतील शेतकऱ्यांच्या शेतात व जनावरे चरणाऱ्या माळरानावर उरले- सुरले साहित्य टाकून देत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याचा नाहक त्रास शेजारील गावांतील नागरिकांना होत आहे.