Maharashtra News : मनमाड येथील इंदूर-पुणे महामार्गावरील, तसेच शहराच्या दोन भागांना जोडणाऱ्या जुन्या रेल्वे ओव्हरब्रिजचा काही भाग बुधवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.
पूल कोसळल्याने दोन्ही बाजूंकडील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. मात्र इंदूर-धुळे-शिर्डी-पुणे मार्गावरील रेल्वेवरील हा एकमेव प्रमुख ब्रिज असल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
बुधवारी पुलाचा पूर्वेकडे असलेला अर्ध्यापेक्षा जास्त भाग खचून ढासळला. लोहमार्गाच्या पुढील भागात हा अपघात झाला. अपघातग्रस्त पुलाला आरसीसी सपोर्ट देऊन दीड महिन्यात कोसळलेल्या भागाचे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू केला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील यांनी दिली.
पूल पडला त्यावेळी मार्गावर वाहने नसल्याने मोठी हानी टळली. दुर्घटनेमुळे इंदूर-पुणे महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असून, दोन्ही बाजूंकडे जाणारी वाहतूक नांदगाव, येवला, लासलगाव यामार्गे वळवण्यात आली आहे.
पूल खचल्याचे समजताच नांदगावचे आ. सुहास कांदे यांनी रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याच्या सूचना केल्या.
अधिकाऱ्यांनी पाहणी करीत लवकरच पूल दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती दिली, यावेळी अल्ताफ खान, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे,
माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, दऊ तेजवानी, सुभाष माळवतकर, लोकेश साबळे, सागर आव्हाड, सचिन दरगुडे, नीलेश व्यवहारे आदी उपस्थित होते.
मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे या महामार्गावर हा रेल्वे ओव्हरब्रिज असून, त्याची लांबी ३५० मीटर, तर उंची नऊ मीटर आहे. १९६४ मध्ये या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. पुलाला जवळपास सुमारे ६२ वर्षे झाले आहेत.
गेल्या पाच वर्षांत या पुलाचा वेळोवेळी भाग कोसळला. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, इंजिनिअर्स असोसिएशन यांनी वेळोवेळी पत्र देऊन, आंदोलन करून या पुलाचे बांधकाम नव्याने करण्याची मागणी केली होती.
अहोरात्र वर्दळ असलेल्या या पुलावरील वाहतूक दुर्घटनेमुळे अन्य मार्गाने वळवावी लागली, त्यामुळे राज्यभरातल्या वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली असून, वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.
विस्कळीत वाहतुकीचा सर्वात मोठा फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला. मनमाड-पुणे, नगर बसेस लासलगावमार्ग सोडण्यात आल्या. वरिष्ठांच्या आदेशानुसार बस वाहतुकीचे पुढील नियोजन सुरू असल्याचे मनमाड आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.